

वडीगोद्री (छत्रपती संभाजीनगर ) : गेल्या ५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज त्यांची भेट घेत काही मागण्या पूर्ण केल्या. त्यामुळे अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी जोरदार जल्लोष करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्याला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर ज्या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात झाली. त्या अंतरवाली सराटी येथे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. गावाच्या मुख्य चौकात एकत्र येत ग्रामस्थांनी गुलाल उधळला. तसेच महिलांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला. यावेळी तरुणांसह काही ग्रामस्थांनी नृत्य करीत मनोज जरांचे यांच्या नावाचा जयघोष करीत आंदोलनाला यश आल्याबद्दल जोरदार आनंद जल्लोष साजरा केला. राज्य सरकारने मराठा समाजाच्या ८ पैकी ६ मागण्या पूर्ण केल्या. हैद्राबाद गॅझेटबाबतही सरकारने जीआर काढला. त्यामुळे येथील नागरिकांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त करीत मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत परिसर दणाणून टाकला. ज्या अंतरवाली सराटी गावात आंदोलनाची सुरुवात झाली त्या ठिकाणी मंगळवारी गावकरी मंडळींच्या आनंदाला उधाण आले होते. येथील नागरिक, महिला, लहान थोरांनी एकच जल्लोष केला.