

Mumbai Maratha Morcha
मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुद उपोषणाचा आज (दि. १) चौथा दिवस आहे. आज सकाळी मराठा आंदोलकांनी मंत्रालयाच्या परिसर दणाणून सोडला. आंदोलकांकडून मंत्रालयाच्या बाहेर (नाष्टा) सुरू केला. मंत्रालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, आज दुपारी मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी बॅरिकेट्स हटवा, आम्हाला मंत्रालय बघायचय, अशी घोषणाबाजी केली. तसेच यावेळी मंत्रालयाच्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
मराठा आंदोलकांनी गर्दी केल्याने मंत्रालय परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मारला. मंत्रालय बघायला चला, बॅरिकेट्स हटवा, आम्हाला मंत्रालय बघायचय, अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडल. पोलिसांनी आंदोलकांना हटवत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
आज सकाळपासून सीएसएमटी आणि आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली. 'सीएसएमटी' स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांनी रेल्वे ट्रकवर उतरु नये, स्थानकावरील गर्दी कमी करावी, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
मराठा आंदोलक मंत्रालय रस्तावरील बॅरिकेटिंगसमोर बसून चटणी भाकर खात आहेत.मराठा आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मदतीचा प्रचंड ओघ सुरु आहे. आंदोलकांची उपासमार होवू नये म्हणून शेतकरी बांधवांकडून नवी मुंबई सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांसाठी ज्वारी, बाजरीच्या भाकरींसह शेंगदाणे चटणी व अन्य साहित्य पाठविण्यात आले आहे.