

Manoj Jarange News
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. दरम्यान, "आम्ही सुद्धा आमची बाजू उच्च न्यायालयात मांडू. आम्हाला मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी मिळणारच," असा विश्वास जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
"मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैेदानावरील आंदोलनास मनाई केली आहे. आम्ही आजपर्यंत नेहमीच न्यायदेवतेचा आदर केला आहे. मागील चार महिने आम्ही सरकारलाही या आंदोलबाबत माहिती देत आहोत. उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. आता मागे हटणार नाही. २९ ऑगस्टला मुंबईला जाणारच," असा निर्धारही जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला.
आम्हाला आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी का नाकारली? आंदोलनच करू नका, असं न्यायालय म्हणू शकत नाही. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करतो. मात्र नियम आणि अटींच्या आधारे आम्हाला आंदोलन करण्यास न्यायालय परवानगी देईल, असा विश्वासही जरांगेंनी व्यक्त केला.
आझाद मैदानावर आंदोलन करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. आम्ही या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागू. न्यायालय आमच्या मागणीचा नक्कीच विचार करेल, असे जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी उद्या मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ते उद्या सकाळी १० वा. आपल्या लाखो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण करणार होते. याच अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्वीय-सहाय्यक राजेंद्र साबळे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटील यांची थेट भेट घेतली.