MNS corruption video
मुंबई : मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारावर एक व्हिडिओ बॉम्ब टाकला आहे. या व्हिडिओमध्ये बांधकाम विभागातील एक अभियंता शासनाकडून मिळणाऱ्या निधीतील टक्केवारी स्वीकारताना दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला असून, शासकीय निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदारांकडून पैसे घेतले जातात आणि बोगस बिले काढली जातात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या अभियंत्याने गोळा केलेले पैसे हे केवळ 'एलओसी' साठीचे असल्याचे तो सांगतो. मात्र, त्याला कार्यकारी अभियंत्यांच्या हिश्शाबद्दल विचारले असता, तो म्हणतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा आहे. संदीप देशपांडे यांनी असा दावा केला आहे की त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह साहेब आणि डीपीटीचे व्हिडिओदेखील आहेत, जे ते कालांतराने समोर आणतील; आज त्यांनी फक्त शाखा अभियंत्याचा व्हिडिओ लोकांसमोर आणला आहे.
बांधकाम खात्यात भ्रष्टाचार आजच होत नाहीये, तर यापूर्वीही होत होता, पण आता भ्रष्टाचाराची पातळी भयावह आणि राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे, असे मनसेने म्हटले आहे.