

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५०० कोटींच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर शिवसेना आक्रमक झाली असून मनोज जरांगे यांचा बोलविता धनी दुसराच असून तो कोण आहे याचे पुरावे आपण देणार असल्याचे शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न कोणाच्या तरी माध्यमातून केला जात आहे. बोलवता धनी कोणता आहे हे तपासले पाहिजे.
त्यासाठी अदृश्य शक्ती तपासली पाहिजे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा काहीही संबंध नसताना कोण तरी तिसरा माणूस त्यांच्याकडून बोलून घेत आहे.
ज्यांना आरक्षण टिकवता आले नाही, त्यांच्याबद्दल चांगले बोलायचे आणि ज्यांनी आरक्षण दिले त्यांच्याबद्दल असे बोलायचे हे बरोबर नाही. एकनाथ शिंदे यांना उभा महाराष्ट्र आणि देश ओळखतो. एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचा काडीमात्र संबंध नाही. लवकर योग्य वेळी पुरावे सादर केले जातील.
श्रीकांत शिंदे हे प्रामाणिकपणे काम करत आहेत. मी अजिबात पलटवार केलेले नाही. त्यांच्याकडे पुरावे असतील तर सादर करावे, असे सामंत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना खुलासा देण्याची गरज नाही. त्यांच्या वतीने मी उत्तर देत आहे. एखादी गोळी घेऊन झोप येत नसेल ते साहेबांवर कायमच बोलत असतात एखाद्याने एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन होईल या गोड गैरसमजामध्ये राहू नये. आपला पक्ष वाढला पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे. अशी टीका उदय सामंत यांनी विरोधकांवर केली.
जरांगेंनी ५०० कोटींचा खुलासा करावा : बारस्कर
मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपाचा खुलासा जरांगे-पाटील यांनी करावा,अशी मागणी माजी सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. यावेळी अजय बारस्कर म्हणाले,मराठा आरक्षण प्रश्नी जरांगे-पाटील यांना बोलणारा अमोल खुणे यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले.
त्याला तीन महिने तुरुंगात राहावे लागले.जरांगे -पाटील हा जलसंपदा विभागातील टेंडरला चिकटलेला मुंगळा आहे. या विभागातील अधिकारी यांना हाताशी धरुन सुमारे ३८०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.तसेच जरांगेंच्या २१ वर्षीय पुतण्याने बीड येथे जमीन खरेदी केली. त्यांच्याकडे एवढ्या लहान वयात कोट्यवधी रुपये आले कुठून? असा प्रश्न बारस्कर यांनी विचारला.