

Manikrao Kokate news
मुंबई: आमदार माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी आता नाशिक पोलिसांनी हालचाली तीव्र केल्या आहेत. कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांच्या अटकेत 'वैद्यकीय अडचण' निर्माण झाली आहे. मात्र, यावर उपाय म्हणून पोलिसांनी आता कोकाटे यांच्या रुग्णालयातील रूमबाहेरच पोलीस गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशीमाहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असून, पुढील कार्यवाहीसाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांच्या अटकेत कोणताही कायदेशीर अडथळा नाही. नियमांनुसार, त्यांच्या अटकेसाठी विधीमंडळाच्या कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. मात्र, कोकाटे यांना अटक केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून विधीमंडळाला रीतसर कळवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असून, पुढील कार्यवाहीसाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
कोकाटे यांच्या नावाचे अटक वॉरंट घेऊन नाशिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक मुंबईत दाखल झाले आहे. हे पथक सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या दालनात पोहोचले आहे. कोकाटे यांना ताब्यात घेताना त्यांच्या प्रकृतीचे काराण असेल तर रुग्णालयातील रूमबाहेरच पोलीस गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर कालपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बातमी समजताच त्यांचे जावई आणि कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.
सुमारे ३० वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी नाशिक शहरात अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. त्यांनी स्वतःसह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या. तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी (दि. १७) जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच न्यायालयाने त्यांच्या अटकेचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.