

Mangoes in the Konkan region Application for GI tag in the name of Valsad Hapus University of Navsari, Gandhinagar, Gujarat
मुंबई : वृत्तसंस्था
हापूस म्हटले की देवगड आणि रत्नागिरी ही दोन नावे आपल्या डोळ्यापुढे चटकन येतात. लालसर रंगाचा आणि चवीला मधाळ गोड असा हापूस आंबा ही कोकणची म्हणजेच महाराष्ट्राची ओळख बनली आहे. पण आता या हापूसवरही गुजरातने आपली नजर वळवली आहे. गुजरातच्या गांधीनगर, नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. हा प्रकार कोकणातील हापूसचे नाव व ओळख चोरण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला जात आहे.
जीआय टॅग ही एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्राशी निगडित उत्पादनाची ओळख जपण्याची प्रक्रिया आहे. महाराष्ट्रातील कोकणातील हापूस आंब्याला २००८ मध्ये जीआय टॅग मिळाला. तो केवळ त्या भागातील माती, हवामान व पारंपरिक पद्धतींमुळे खास आहे. पण आता गुजरातमधील गांधीनगर व नवसारी विद्यापीठाने २०२३ मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्जामुळे कोकणच्या हापूसवर मानांकनाचे संकट घोंगावत आहे.
प्रादेशिक अतिक्रमणाचा कथित प्रकार
उल्लेखनीय बाब म्हणजे वलसाडचे भाजप खासदार धवल पटेल यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजनेअंतर्गत या टॅगसाठी पाठिंबा मागितला आहे. या अर्जाला नवसारी विद्यापीठ, गुजरात सरकारसह काही शेतकरी संघटनांचाही पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी हा प्रकार प्रादेशिक अतिक्रमण व हापूसची चोरी असल्याचा दावा केला आहे.
कोकणची ओळख पुसण्याचा डाव : अॅड. असीम सरोदे
विधिज्ञ असीम सरोदे याप्रकरणी म्हणाले, वलसाड हापूस नावाने जागतिक भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी सुरू असलेले जोरदार प्रयत्न साधे नाहीत. कोकणातील रत्नागिरीत सरकारला मिलिटरी इंडरस्ट्रीअल कॉम्प्लेक्स करायचा आहे व त्यासाठी कोकणातच हापूस होतो हे वास्तव नाकारण्याची आणि कोकणची ओळख पुसण्याची पार्श्वभूमी तयार केली जातेय, असे ते म्हणाले.