

विक्रम बाबर
पनवेल : पनवेल शहरात उंच इमारती, हाई-राईज रेसिडेन्शियल टॉवर्स, कार्यालयीन संकुले मोठ्या प्रमाणावर उभी राहत असून त्यांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 55 व 28 मीटर यांत्रिकी शिडी खरेदी करण्यात येणार असून 20 मजले उंचीवरील आग विझवण्याची त्यांची क्षमता असणार आहे.
महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी वाढत्या आगीच्या घटना पाहता हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे उपलब्ध साधनसामग्री मर्यादित आहे. विशेषतः उंच इमारतींमध्ये आग लागल्यास किंवा अडकलेल्या व्यक्तींना वाचवायचे असल्यास आवश्यक त्या उंचीपर्यंत पोहोचण्याकरिता आधुनिक एरियल लॅडर उपलब्ध नाही. 55 मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म हे उंच इमारतींमध्ये (15 ते 20 मजले व त्यापेक्षा जास्त) पोहोचण्यासाठी उपयोगी ठरेल, तर 28 मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म मध्यम उंचीच्या इमारती, गृहनिर्माण संकुले, रुग्णालये, शाळा, हॉटेल्स आदी ठिकाणी बचावकार्यासाठी उपयुक्त ठरेल.
या खरेदी प्रक्रियेसाठी निविदा मागवण्यात आल्या असून, तांत्रिक निकषांनुसार पात्र कंपन्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आवश्यक तांत्रिक वैशिष्ट्ये, सुरक्षितता मानके, कार्यक्षमता व दीर्घकालीन देखभाल खर्च यांची सखोल तपासणी करून योग्य तो प्रस्ताव निवडण्यात येणार आहे.या संपूर्ण प्रकल्पावर सुमारे 22 कोटींहून अधिक खर्च (जीएसटीसह) येणार आहे.