

मालाड : मालाड कुरार गाव येथील रस्त्यातील नाले व फुटपाथ बांधण्याचे काम गेल्या सहा महिन्यांअगोदर करण्यात आले होते. या फूटपाथच्या मधोमध ज्या टाइल्स लावल्या आहेत त्या टाइल्सचा दर्जा कमकुवत असल्याने त्या अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. काही ठिकाणी निखळल्या आहेत. काही ठिकाणी अर्ध्यावरच स्टाइल्स लावण्यात आल्या असून काही ठिकाणी टाइल्स लावल्याच नाहीत. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लावलेल्या टाइल्स निखळल्याने स्थानिक नागरिक, दुकानदार, ज्येष्ठ नागरिक तसेच दृष्टीहीन नागरिकांना चालण्यासाठी रस्ता धोकादायक झाला आहे.याचाच त्रास नागरिकांनी का सोसावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मालाड महापालिका उत्तर विभागाचे बांधकाम अधिकारी आणि इंजिनिअरच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या टाइल्स 2024 मध्ये मान्सूनपूर्वी बसवण्यात आल्या होत्या. टाईल्स बसवण्याचा हा उपक्रम 2016-17 मध्ये राबविण्यात आलेल्या पादचारी प्रथम धोरणाचा भाग होता.यानंतर मुंबईत विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला असला तरी काम करतेवेळी ठेकेदाराकडून होणार्या भ्रष्टाचारामुळे कामाचा दर्जा ठेवला गेला नाही. यामुळे जनतेच्या कराचा पैसा व्यर्थ जात असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.परिणामी, महापालिका अधिकार्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
सहा महिन्यांपूर्वी हा रस्ता बनवण्यात आला. परंतु काँक्रिटीकरण करत असताना मधोमध लावलेल्या टाइल्सला दर्जा नसल्यामुळे लगेच तुटल्या आहेत. यामुळेच आमच्यासारख्या वरिष्ठ नागरिकांचा खड्ड्यात पाय अटकून ठेस लागून पडायला होत आहे. अनेकजण पडलेही आहेत. यामुळे या रस्त्यावरून चालणे अत्यंत कठीण होवून बसले आहे . शाळेतील मुलांना घेऊन जातानाही पाय अडकून मुले पडत आहेत. मनपा प्रशासनाने यावर योग्य ती कार्यवाही करून टाइल्स काढून प्लेन रस्ता करावा.
कविता खरात,एक पालक