

मुंबई : मुंबई शहरातील घराघरातून सॅनिटरी पॅड्स, डायपर्स 100 टक्के संकलन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासह पिवळ्या पिशव्यांसह पिवळे कचरा डबे, हा कचरा वाहून नेणार्या वाहन संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पॅड्स व डायपरच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सॅनिटरी पॅड्स, डायपर्स आदींची विल्हेवाट ही पर्यावरणपूरक पद्धतीने नष्ट करणार्या भट्टीद्वारे (इन्सिनरेटर) करण्यात येते. सॅनिटरी पॅड्स, डायपर्स व अन्य घातक वस्तू संकलनासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागात 0.6 टन क्षमतेचे स्वतंत्र वाहन देण्यात आल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.
या कचर्याच्या संकलन क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांनी आणि विविध संस्थांनी सॅनिटरी पॅड्स व अन्य घटक कचर्याचे वर्गीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जोशी यांनी केले.
गेल्या दोन महिन्यांत क्यूआर कोड स्वयंनोंदणी प्रणालीचा वापर करून 4 हजारांहून अधिक संस्थांनी नोंदणी केली आहे. नागरिकांना आणि संस्थांना क्यूआर कोड स्वयंनोंदणी प्रणालीद्वारे नोंद करायची असून महापालिका क्षेत्रात सॅनिटरी कचरा संकलनासाठी जनजागृती करण्याकरिता निसर्ग या संस्थेच्या माध्यमातून विविध पातळीवर जनजागृती व संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
10 इन्सिनरेटर प्रकल्पांचे आधुनिकीकरण
10 इन्सिनरेटर प्रकल्पांचे अद्ययावतीकरण व आधुनिकीकरण घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सध्या सुका कचरा विल्हेवाट ही पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यासाठी 41 भट्टी (इन्सिनरेटर) कार्यरत आहेत. स्वयंचलित (कन्व्हेयर बेल्ट)चा वापर करून कचर्याचे विलगीकरण करण्यात येईल. तसेच कर्मचार्यांना सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.