

मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगत बेकायदा वसलेल्या गरीब नगर झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेने अखेर मोठ्या बंदोबस्तात मंगळवारी बुलडोझर चढवला. 140 झोपड्यांवर कारवाई करण्यात आली असून 23 मेपर्यंत येथील पाचशे झोपड्या हटवण्यात येणार आहेत. वांद्रे टर्मिनसच्या विस्तारात या झोपड्या अडथळा ठरत होत्या.
रेल्वेच्या जागेवर अगदी तीन मजली, चार मजली बेकायदा झोपडपट्टी येथे उभी राहिली होती. रेल्वे पादचारी पुलापर्यंत त्यांचा विस्तार झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न होता. मुंबई उच्च न्यायालयाने 5 मे रोजी पश्चिम रेल्वे परिसरातील बेकायदेशीर बांधकाम हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर रेल्वेने पालिका आणि पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीम आखत मंगळवारी पथक येथे दाखल झाले.
कारवाई सुरू केल्यानंतर स्थानिकांनी मोठा विरोध केला. महिलांचा मोठा गट कारवाईत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होता. मात्र परिसरात मुंबई पोलीस, रेल्वे पोलिस आणि जीआरपीचे 400 जवान तैनात करण्यात आले होते.
यासह अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय ही कारवाई करण्यात आली. दिवसभरात 140 झोपड्या हटवण्यात आल्या आहेत.
पुढील पाच दिवस 23 मे पर्यंत ही कारवाई चालणार आहे. एकूण पाचशे बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असून 2021 रोजी झालेल्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या झोपडीधारकांना अभय मिळणार आहे.
उच्च न्यायालयाने रेल्वेच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालाचे पालन म्हणून पश्चिम रेल्वेला येथील सर्व अनधिकृत बांधकामे तत्काळ हटवणे बंधनकारक आहे. या कारवाईत शंभर झोपड्यांना वगळावे लागणार आहे. उर्वरित ज्या सुमारे 500 झोपड्या आहेत. त्या तत्काळ हटवाव्या लागणार आहेत. आम्ही हा परिसर पूर्णपणे मोकळा करू. मूठभर अनधिकृत अतिक्रमणांमुळे संपूर्ण मुंबई शहराला वेठीस धरता येणार नाही.
- विनीत अभिषेक (पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी )