

ठळक मुद्दे
पुणे, नाशिक, सोलापूर, नवी मुंबई, मीरा भाईंदरमध्ये भाजप स्वबळावर
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्याचे मनोमिलन
सोडून शिंदे गट राष्ट्रवादीच्या पुण्यात भाजप संपर्कात
फक्त कोल्हापूर, पनवेलमध्येच सत्तारूढ महायुती एकसंध
मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास एक दिवस शिल्लक असताना सोमवारी युती आणि आघाड्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे, नाशिक, सोलापूर, अमरावती, नवी मुंबई, मीरा भाईंदर आदी महापालिकांमध्ये भाजपा शिवसेनेची युती फिस्कटली असून, याठिकाणी भाजपा स्वबळावर लढणार आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे महायुतीचे त्रिमूर्ती कोल्हापूर आणि पनवेल महापालिकेतच एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे दिसते. या निवडणुकीत महाविकास आघाडीही ठिकठिकाणी फुटली असून नव्या समीकरणांचा उदय झालेला दिसतो. पक्षफुटीनंतर दुरावलेले शरद पवार-अजित पवार या काका पुतण्याचे मनोमिलन झाले असून, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे.
राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत राज्याच्या राजकारणात एकत्र असलेली भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) यांची महाविकास आघाडी अनेक ठिकाणी फुटली आहे. काही ठिकाणी नवी समीकरणे तयार झाली आहेत.
पुणे, नाशिक, सोलापूर, अमरावती, नवी मुंबई, मीरा भाईंदरमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा निष्फळ ठरली आहे. भाजपा या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढविणार हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने केलेली जागांची मागणी भाजपाने अमान्य केल्याने शिवसेनेने भाजपची साथ सोडत अन्य पक्षांसोबत युती करण्याचा पर्याय निवडला आहे. प्रत्यक्षात मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर येथे युतीतील हे दोन पक्ष एकत्र आले आहेत. तर कोल्हापूर आणि पनवेलमध्ये महायुतीतील तीनही पक्षाची महायुती झाली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा खरी ठरली असून अजित पवारांकडून झालेल्या पक्ष फोडीचा मुद्दा बाजूला ठेवून शरद पवार यांनी अजित पवारांसोबत या दोन महापालिकांमध्ये आघाडी करण्यासाठी निर्णय घेतला आहे.
पुण्यामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आले आहेत. ज्या मनसेला विरोध करत काँग्रेसने मुंबईत महाविकास आघाडी तोडली त्याच मनसेला पुण्यात सोबत घेण्यात काँग्रेसला कोणतीही अडचण आलेली नाही. काँग्रेस आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन पुण्यात एकाच वेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या आघाडीशी लढतील.
पुण्यात शिंदे गटाला जादा जागा सोडण्यास नकार दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा सुरू केली. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २५ उमेदवारांचे अर्ज भरण्याचे आदेशही त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले.
पुण्यातील प्रभाग २४ मध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव आणि पत्नी प्रतिभा यांच्या उमेदवारीसाठी शिंदे गट आग्रही होता. मात्र, भाजपने तिथे दोन्ही उमेदवार जाहीर करून धंगेकर यांची आणि ओघानेच शिंदे गटाची कोंडी केली. धंगेकरांच्या पत्नी व मुलाला रिंगणात उतरवायचे असेल तर शिंदे गटासमोर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हे दोनच पर्याय उरले आहेत. महाविकासमध्ये ठाकरे बंधू असल्याने शिंदे गट प्रयत्नदेखील करणार नाही. त्यामुळे धंगेकर यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
नाशिक
नाशिकमध्ये भाजपने आपले मित्रपक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोघांना युती करण्यासाठीचा कुठला निरोपही दिला नाही. परिणामी, इथेही महायुतीचा युतीधर्म संकटात आला. भाजपला आव्हान देत शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र आले. त्यांच्या युतीत सर्वाधिक जागा शिंदे गट लढवणार असून, अजित पवार गटाने लहान भावाची भूमिका घेतली आहे. नाशकात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे या घटक पक्षांची महाविकास आघाडीही रिंगणात उतरली असल्याने नाशकात चुरशीचा तिरंगी सामना बघायला मिळेल.
नवी मुंबईत गणेश नाईक परिवार म्हणजेच भारतीय जनता पक्ष असे समीकरण असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचा सुरू असलेला संघर्ष जागावाटपातही डोकावला. त्यातही भाजपमध्ये गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे अशीही चुरस आहे. गणेश नाईकांनी आपल्या पाठीराख्यांसाठी ८० जागा मागितल्या, तर आमदार म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघातील प्रभागांसाठी ४० मागितल्या. एकूण जागा १११ असताना भाजपच्या या दोन नेत्यांनीच १२० जागांची मागणी केली. त्यामुळे शिंदे गटाला सोडण्यासाठी जागा आणायच्या कुठून या प्रश्नावर भाजप-शिवसेना युती तटली
मुंबईतील २० जागांचा तिढा सुटला असला तरी इथेही महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेले अजित पवार स्वबळावर उतरल्याने महायुती भंगली. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत असून त्यांच्या आघाडीत मनसेही सामील झाली आहे. मुंबईत मनसेमुळे महाविकास आघाडी तुटली आणि काँग्रेस स्वबळावर उतरली आहे.
पनवेलमध्ये ७८ जागांपैकी ७१ जागा भाजप लढवणार असून, शिंदे गटाला ४ तर अजित पवार गटाला २ जागा सुटल्या आहेत. रिपाइं आठवले गटाला १ जागा देण्यात आली. इथे महायुती अभंग राहिली. पनवेलमध्ये शेकाप-शरद पवार गट-उद्धव ठाकरेंची शिवसेना हे तिघे एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीचे चित्र मात्र अद्याप स्पष्ट नाही. अलिकडच्या बैठकीनुसार ७८ जागांपैकी शेकाप सर्वाधिक ३८ ते ४०, उद्धव ठाकरेंची शिवसेना २०, शरद पवार गट २, मनसे ४, सपा १, आणि काँग्रेस ११ असे जागावाटप होऊ शकते. सोमवारी रात्री उशिरा किंवा मंगळवारी सकाळी निर्णय झालेला असेल, आणि उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांच्या हाती एबी फॉर्मूस ठेवले जातील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मीरा भाईंदरमध्येही महायुतीत जागावाटपावरून बिनसल्याने भाजपाने सर्व ९५ जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसही येथे स्वतंत्रपणे लढत आहे, तर ठाकरेंची शिवसेना ७६, मनसे १३ तर शरद पवारांची राष्ट्रवादी ६ जागांवर आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहे.
भिवंडीमध्ये ९० जागा असून येथे भाजप आणि शिवसेना यांची युती जाहीर झाली असून भाजप ३० तर शिवसेना २० जागांवर लढणार आहे. उर्वरित जागांवर उमेदवारांचा शोध सुरू असून उमेदवार न मिळाल्यास तेथे अपक्षांना उमेदवारी देण्याचा निर्णय या दोन पक्षांमध्ये झाल्याचे समजते.
कल्याण-डोंबिवलीसाठी रात्री उशिरापर्यंत भाजप आणि शिवसेनेत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. १२२ जागांपैकी कल्याण पूर्वेतील २५ जागांवर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली होती. भाजपने येथून ९ जाणांना एबी फॉर्म दिले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने आपली यादी जाहीर केली नव्हती.
उल्हासनगरमध्ये जागा वाटपात तोडगा निघू न शकल्याने शिवसेना-भाजप स्वबळावर ही निवडणूक लढणार आहेत. ७८ जागांपैकी गेल्या निवडणुकीत शिवसेनेने २५, भाजप आणि टीम ओमी कलानी युतीने ३१ जागा जिंकल्या होत्या.
वसई-विरारमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती झाली असून दुसरीकडे बहुजन विकास आघाडी, मनसे आणि काँग्रेस अशी आघाडी या निवडणुकीत उतरली आहे, तर ठाकरे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतील. ११५ जागा असलेल्या या महापालिकेत गेल्यावेळी बहुजन विकास आघाडीने १०७ जागा | जिंकल्या होत्या.