

मुंबई : भाजपने सुरू केलेली वागणूक एखाद्या अबलेला त्रास देण्यासारखी असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी केलेले विधान, शिंदे गटातील डोंबिवलीतील नगरसेवकांचे तसेच दादा भुसे, संजय शिरसाट या मंत्र्यांच्या स्पर्धकांना भाजप प्रवेश दिल्यामुळे मंगळवारी कमालीच्या अस्वस्थ झालेल्या शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहणे टाळले.
हा बहिष्कार असल्याची चर्चा सुरू झाली असताना, नंतर या मंत्र्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या पक्ष प्रवेशांबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, मित्रपक्षांतील नेत्यांना घेणे तुम्ही सुरू केले आहे, असे सांगत फडणवीसांनी नापसंती व्यक्त करीत भाजप आक्रमक असेल ही चुणूक दाखवताच शिंदे यांनी सामोपचाराची भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील भाजपच्या नेत्याचा पक्षातला प्रवेश थांबवला.
मात्र, आज भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील दरी समोर आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही सोमवारी रात्री माझ्यासमवेत होते, ते सकाळी दुसरीकडे गेले, असे सांगत भाजपने कोकणात दिलेल्या शहाचा उल्लेख केला. मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे गट गैरहजर राहिल्यानंतरही भाजपने आक्रमक भूमिका कायम ठेवली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंतर भेटीला गेलेल्या शिंदे यांच्या सहकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर बावनकुळे यांनी जाऊन काही मध्यस्थी केली, असे सांगितले जाते. या गदारोळातच मंगळवारी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उदय सामंत यांच्याशी न झालेली भेट, कल्याण-डोंबिवलीतील रवींद्र चव्हाण यांच्या आक्रमक खेळीनंतर नाराज झालेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, असे अनेक विषय मंगळवारी चर्चेत होते.
संध्याकाळी उशिरा एकनाथ शिंदे यांनी नरमाईची भूमिका घेत शेवटी आपण जनतेच्या सेवेसाठी एकत्र आलेले आहोत, पक्षीय राजकारणासाठी नाही असे सांगत पक्षातील नेत्यांना शांत केले, असे समजते. मात्र, तोवर आमदारकीच्या निवडणुकीत क्रमांक दोनवर असलेले काही महत्त्वाचे नेते, कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक भाजपवासी झाले होते.
कल्याण-डोंबिवली येथे भाजपमधील सहा नगरसेवकांना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतःच्या पक्षात घेतल्याने दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. भाजप नेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुका एकत्रितरीत्या लढण्यासाठी जनभावना लक्षात घेत युती योग्य ते वागेल असे म्हणत सारवासारव केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही मंत्री एबी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस असल्यामुळे हजर नव्हते, असे सांगत या वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शिंदे सेनेच्या या भूमिकेवर ‘एक्स’वर टीका केली. समाजमाध्यमांवर बोलताना मिंदे सेनेचे काही नेते नाराज होते, संतापले होते असे समजते, असे टोमणे मारत आता कोणत्या गावाला जाणार, असाही प्रश्न केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका परस्परांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांमुळे युतीमध्ये कमालीचा ताण निर्माण झाला आहे.
संजय शिरसाट, दादा भुसे, प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय राठोड हे मंत्री मंत्रालयात असूनही मंत्रिमंडळ बैठकीला हजर नव्हते. मात्र, गैरहजेरीनंतर लगेचच गुलाबराव पाटील, संजय शिरसाट आणि भरत गोगावले हे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस गेले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्ष प्रवेशाला प्रारंभ तुम्ही केलात, अशा स्पष्ट शब्दांत सुनावल्याचे समजते.