मुंबई : मुंबईत काही पंपांवर सीएनजी पुरवठा सुरू झाला असला तरी अत्यंत कमी दाबाने पुरवठा होत असल्याने संपूर्ण मुंबईतील रिक्षा-टॅक्सी प्रवासी वाहतूक सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारीही कोलमडून पडली.
आरसीएफ कॉलनीतील पाईपलाईन दुरुस्तीचे काम मात्र अजूनही सुरूच आहे. सीएनजी वापरकर्त्यांसाठी पर्यायी व्यवस्था करून शक्य तितके सीएनजी स्टेशन चालू ठेवण्याचा महानगर गॅस लिमिटेडचा प्रयत्न असल्याची माहिती कंपनीने दिली. महानगर गॅस लिमिटेडने तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे निवेदन जारी केले आहे. मात्र पूर्ण क्षमतेने गॅस पुरवठा सुरू होण्यास आणखी वेळ लागणार असल्याचे महानगर गॅसने स्पष्ट केले.
रविवारी झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर ठप्प झालेला सीएनजी पुरवठा मंगळवारी रात्रीपर्यंत पूर्णपणे सुरळीत झालेला नव्हता. टॅक्सी, ऑटो आणि कॅब चालक आपल्या गाड्या पंपांसमोर उभ्या करून हतबल आहेत. महानगर गॅस लिमिटेडच्या काही पंपांवरील पुरवठा सुरू झाला असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पंपांवर उभ्या वाहनांची प्रचंड गर्दी वेगळे चित्र दाखवतेे.