Rohit Patil: आत्ताच्या मुख्यमंत्र्यांकडे व्हिजन आहे- रोहित पाटील; पक्षनिष्ठेबाबतही स्पष्टीकरण

Pudhari Mahasummit 2026 : पुढारी न्यूजच्या तिसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त आयोजित महासमिट मधील राजकारणात तरुण आणि तरुणांचे राजकारण या चर्चासत्रात घेण्यात आला.
Pudhari News Maha Summit 2026
Pudhari News Maha Summit 2026Pudhari
Published on
Updated on

Rohit Patil Satyajeet Tambe Pudhari News Maha Summit 2026

मुंबई : अनुपमा गुंडे

सध्या जेन झीच्या आंदोलनाने देशात एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे, त्यामुळे राजकारणातील परंपरागत राजकीय घराण्यातील नेक्स्ट जनरेशन झेन जी च्या प्रश्नाकडे कसे पाहते, याचा वेध पुढारी न्यूजच्या तिसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त आयोजित महासमिट मधील राजकारणात तरुण आणि तरुणांचे राजकारण या चर्चासत्रात घेण्यात आला.

राजकीय वारसाचा चमचा तोंडात घेऊन आलो तरी धर्म, जात, विचारधारा, वारसा कितीही मोठा असला तरी जनमत, मतदार संघातील जनतेचे प्रश्न, जनसंपर्क आणि मतदारांचा विश्वास आणि नवमतदारांची विचार प्रक्रिया या बळावरच हा राजकीय प्रवास होणार आहे, याची खूणगाठ बांधणे गरजेचे असल्याचे ठाम मत काँग्रेसचे सत्यजीत तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पाटील, भाजपाच्या आमदार श्रीजया चव्हाण, आमदार विक्रमसिंह पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आमदार सना मलिक आणि वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले. तरुण प्रतिनिधींशी पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी आणि सहाय्यक वृत्तसंपादक नम्रता वागळे यांनी संवाद साधला. यावेळी तरुण पिढीने ठाम आणि प्रगल्भपणे सडेतोड मते मांडली. त्या चर्चेचा हा आढावा-

प्रश्न : राजकारणाकडे प्रामुख्याने आजकाल करियर म्हणून बघितले जाते. सत्ताधाऱ्यांकडून बोलावणे, विचारणा झाली असतांनाही तरूण वयात पक्षाशी एकनिष्ठ राहणे ही बांधिलकी आहे, धारणा, त्यामागचा विचार काय आहे ?

रोहित पाटील : मी मुख्यमंत्र्यांकडे कोणतेही काम घेऊन गेलो आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा फोटो समाज माध्यमांवर टाकला तरी मी त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे का? अशा चर्चा होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २८८ आमदारांचे मुख्यमंत्री आहेत. सुदैवाने आत्ताच्या मुख्यमंत्र्यांकडे व्हिजन आहे, आपण एखादा चांगला मुद्दा घेऊन गेलो की त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतो. मी माझ्या मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो. या औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी ताब्यात घेण्यासाठी माझ्या वडिलांच्या काळापासून संघर्ष करावा लागत होता. गेल्या ६ वर्षात मी त्या ठिकाणच्या लोकांशी संवाद सुरू केला आहे.

मी लोकांची समजूत काढून त्या भागात एमआयडीसी मंजूर करून घेतली. मात्र एमआयडीसी झाली की लगेच उद्योग येतात, अशी लोकांची धारणा असते, परंतु तसे होत नाही, त्यासाठी अनुकूल वातावरण आणि इको सिस्टिम तयार करावी लागते, असे झाले तर बहुराष्ट्रीय कंपन्या येतात. तासगावच्या औद्योगिक वसाहतीच्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना माझे व्हिजन सांगितले, त्यासाठी अमेरिका, जपानचे शिष्टमंडळ भारतात आणले.

या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन सामंजस्य करार केला, हे फक्त कवठे महांकाळ किंवा तासगावसाठी नाही तर तेथील ज्या कंपन्या महाराष्ट्रात येऊ इच्छितात, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली, मात्र याबाबतची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यावर अनेकांनी मला राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला. त्यामुळे अशा वेळी परिस्थिती समजून घ्यावी लागते. हा विचार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आहे.

माजी पंतप्रधान पी व्ही. नरसिंहराव यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना शिष्टमंडळात घेतले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी शरद पवार यांना शिष्टमंडळात घेतले. त्या अनुभवाचा उपयोग शरद पवार यांना महाराष्ट्रात औद्योगिक विकास करतांना झाला, त्यामुळे हे जुन्या पिढीचे विचार जोपासता आले पाहिजेत, राजकारणात तोच विचार घेऊन पुढे जाण्याची गरज आहे, तोच विचार ते राजकारणात पुढे घेऊन जातांना दिसत आहेत, म्हणून आम्ही एकत्र काम करत आहोत.

Pudhari News Maha Summit 2026
Pratap Sarnaik On Thane Metro: डिसेंबरमध्ये ठाण्याची मेट्रो धावणार : मंत्री सरनाईक

प्रश्न : आपला देश हा तरुणांचा देश आहे. या देशात मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना ही आपल्या देशाची विचारधारा आहे, पण आज आपल्या देशात धार्मिक ओळख वाढली आहे, त्याचे कारण काय ?

सना मलिक : जनरेशन नेक्स्टचा विचार हा पुढारीच्या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. दिल्लीत कुठल्या तरी एका पार्टीने आंदोलनाची सुरुवात केली, नंतर या आंदोलनात पुढची पिढी (नेक्स्ट जनरेशन) जोडली गेली. आंदोलनात सहभागी झालेल्या या तरूणांचा धर्म कुणी बघितला का? नाही, कारण त्यांना धर्माचा काहीच फरक पडत नव्हता, शिक्षण, रोजगार प्रमुख विषयांनी प्रेरित हे आंदोलन होते, त्यामुळे आपण धर्म धर्म म्हणतो. पण धर्म म्हणजे काय आहे? धर्म ही माझी वैयक्तिक आणि श्रध्देची बाब आहे. पण आपण जेव्हा राजकारणात येतो., पण राजकारण हे समाजासाठी असते.

आपल्या संविधानाने आपल्याला आपला धर्म राखण्याचा, त्याचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे, पण आपल्याकडे धर्मावर नॅरेटिव्ह निर्माण केले जाते. त्यामुळे ओळख देतांना त्या व्यक्तीच्या व्यवसायाची ओळख दिली जात नाही, पण धर्म आणि लिंगाधिष्ठित ओळख मात्र करून दिली जाते, ती कशासाठी? तसेच आमची ओळख करून देतांना घराणेशाहीचाही उल्लेख केला जातो. मला राजकारणात संधी मिळाली असली तरी मला लोकांमधून निवडून यावेच लागले.

प्रश्न: आत्ताचे राजकारण घुसळून निघत आहे. एक कॉक्रोच पार्टी येते आणि विरोधकांमुळे खळबळ निर्माण होते आणि देशात विरोधकांमध्ये एकदम ऊर्जा येते. असे का घडते? पण अशी आंदोलने धोकादायक ठरू शकतात का ?

सत्यजीत तांबे : काँक्रोच जनता पार्टीचे आंदोलन हे केवळ सत्ताधाऱ्यांनाच नाही तर विरोधकांनाही आव्हान आहे. कारण विरोधकांवरचाही लोकांचा विश्वास उडत चालल्याने लोक तिसऱ्या पर्यायाकडे वळले, हे आंदोलनामागचे खरे कारण लक्षात घेतले पाहिजे. लोकशाहीत विरोधक असलेच पाहिजेत, त्यांनी त्यांची भूमिका पार पाडायला हवी, लोकांचा जितका सरकारवर विश्वास असतो, तेवढाच विश्वास विरोधकांवर असायला हवा, हे लोकशाहीचे द्योतक आहे, मात्र दुर्दैवाने ते झाले नसल्याने लोकांना आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले. त्यामुळे लोक त्या आंदोलनाच्या मागे उभे राहिले.

प्रश्नः तुमचे सगळे लहानपण काँग्रेसच्या वातावरणात, विचारधारेत गेले, वडिलांनी निर्णय घेतल्यामुळे तुम्ही या पक्षात आलात, या नव्या सगळ्या वातावरणाशी जुळवून घेतांना काय वाटते?

श्रीजया चव्हाण : वडिलांनी मुख्यमंत्रीपद आणि अनेक मंत्रीपदे भूषविली, पण या सगळ्यापासून आम्हांला दूर ठेवण्यात आले होते. आमच्या कुटुंबीयांनी आमच्या शिक्षणावरच लक्ष केंद्रित करायला लावले, केवळ शिक्षणच नाही तर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यावर भर द्यायला लावला. पण जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा मी आधीचे काँग्रेसचे वातावरणही बघितले होते आणि भाजपचे जग बघते आहे. आमच्या कुटुंबात नेहमीच कष्टाला प्राधान्य आणि महत्व दिले जाते. जिथे आहे तिथे प्रामाणिकपणे काम करा, आपल्या मतदार संघात चांगला जनसंपर्क ठेवा, लोकांचे प्रश्न सोडवा हेच नेहमी सांगितले जाते.. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य मला प्रेरणादायी वाटतेच, माझे आजोबा, वडील आणि आई या तिघांकडूनही मला राजकारणात खूप काही प्रेरणादायी शिकायला मिळाले आहे.

Pudhari News Maha Summit 2026
Tukaram Mundhe: केवळ झुरळ दिसले म्हणून परवाना रद्द होत नाही!

प्रश्नः भाजपमध्ये सर्वच जागा भरलेल्या आहेत, त्यामुळे भाजपमध्ये पुढच्या निवडणुकीच्या वेळी मला कोणते पद, मंत्रिपद मिळेल, याचा विचार तुम्ही करता का ?

विक्रमसिंह पाचपुते : निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना माझी उमेदवारी निश्चित झाली. त्यानंतर मी आमदार झालो. मी आमदार म्हणून खूष आहे. मी आमदारकी मागितली नव्हती, पक्षाने तिकीट दिले, लोकांनी विश्वास टाकला म्हणून मी आमदार झालो.

गेल्या वर्ष-दीड वर्षात आमदार म्हणून काय काम केले, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. संधी असली की त्याचे सोने करण्याची जबाबदारी तुमची असते, हे माझ्या वडिलांनी सांगितले आहे. मी विधिमंडळात आमदार आहे, त्यामुळे आम्हांला कायदे करण्याचा, कायदे बदलण्याचा, सुधारणा करण्याचा अधिकार आहे, हीच मोठी जबाबदारी आहे.

प्रश्न : जंतर मंतरच्या आंदोलनाचा चेहरा असलेले अभिजीत दिपके, मागासवर्गीय समाजातून येतात. सोशल मीडियाचा वापर करून त्यांचे आंदोलन होते. पण अभिजीतच्या आधी पुण्यात फर्ग्यूसनच्या एका आंदोलनात सुजात आंबेडकर यांनी मोठे आंदोलन केले, पण सुजात आंबेडकर नंतर कुठे गेले ?

सुजात आंबेडकर : ज्या समाजांपर्यंत आत्तापर्यंत सत्ता पोहोचली नव्हती, ज्या ज्या लोकांना आत्तापर्यंत लोकशाही म्हणजे फक्त पंजाला किंवा कमळाला मत द्यायचं, कमळाबाईला मतं मारायची एवढंच कळलं होतं, त्या लोकांना आम्हाला तिकिटं देऊन, त्यांना बळ देऊन त्यांना सतेच्या केंद्रस्थानी पोहोचवणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना नेतेपदी बसवणे हीच वंचितची स्थापने-पासूनची भूमिका आहे आणि ती कायम आहे.

प्रस्थापित राजकीय घराणाच्या बाहेरील माणसाने आंदोलन करणे ही मोठी गोष्ट आहे आणि या आंदोलनाला देशभर प्रतिसाद मिळाला, मंत्र्यांनी राजीनामा दिला ही मोठी गोष्ट आहे, त्यामुळे या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद पाहता ते आमच्यातल्या कुणी का केले नाही, त्यात आमचा माणूस मागे का राहिला या वादात आम्ही अडकत नाही, तर ते आंदोलन कसे यशस्वी झाले, ते करणारा आमच्यातलाच आहे, त्यात आम्ही जिंकलो असा विचार आम्ही नेहमीच करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news