Maharashtra Weather : महाराष्ट्रासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे; 'या' भागात जोरदार पाऊस
Maharashtra Weather Update :
भारतीय हवामान खात्यानं पुढचे तीन दिवस भारतातील बिहार, महाराष्ट्र, गोवा, असाम आणि पूर्वोत्तर राज्यात वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दिल्ली आणि एनसीआरमध्ये १३ आणि १४ सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात एकूणच देशभरात पावसाचं प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. यात पूर्वोत्तर राज्यात पावसाची तीव्रता जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच पूर्वेकडील बिहार, हिमालयाचा काही भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरूणचाल प्रदेश, नागालँड, मणिपूर, असाम आणि मेघालयात जोरदार पाऊस पडेल.
दक्षिणेकडील राज्यांचा विचार केला तर इथं अजून काही दिवस पावसाच्या सरी पडतील. महाराष्ट्रात देखील येत्या दोन ते तीन दिवसात चांगल्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्यानं देशातील पूर प्रवण क्षेत्रातील भागात राहणाऱ्या लोकांसाठी सतर्कतेचा इशारा दिलाय.
पश्चिम भारताचा विचार केला तर महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण आणि गोवा या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिकांना अतीवृष्टीदरम्यान प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या या भागात पडणार जोरदार पाऊस
मध्य महाराष्ट्रात १२ ते १७ सप्टेंबर दरम्यान हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर १२ आणि १३ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि गोवा भागात देखील १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान, हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील, तर १३ आणि १४ सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता आहे.

