

मुंबई : शाळांमध्ये शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करताना राज्यातील जनतेचे मत जाणून घेतले जाईल. त्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर अशा प्रमुख शहरांचा दौरा करणार आहोत. तसेच, जनतेला आपली मते मांडण्यासाठी लवकरच वेबसाईटही खुली करण्यात येईल, अशी माहिती त्रिभाषा सूत्राची शिफारस करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांनी बुधवारी दिली.
राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव आणि समितीच्या सदस्यांच्या नेमणुकीनंतर समितीची पहिलीच बैठक बुधवारी पार पडली. त्यानंतर समितीचे अध्यक्ष जाधव यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत ही समिती कामकाज कशी करेल यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्रिभाषा सूत्रासंदर्भात वेबसाईट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन राज्यांत अंमलबजावणी
देशात त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केवळ जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोनच राज्यांत करण्यात आली आहे. इतर राज्यांत याबाबत नेमके काय करण्यात येते त्याची माहिती आपली समिती घेत आहे. महाराष्ट्र याबाबत काय भूमिका घेेते याकडे इतर राज्यांचे लक्ष लागले असल्याचेही जाधव म्हणाले.
5 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणार
समितीने केवळ ऑनलाईनच नव्हे, तर प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधण्याचाही निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये दौरे आयोजित करण्यात आले आहेत. या दौर्यांमध्ये लोकांची मते आणि सूचना गोळा केल्या जातील. या दौर्यांमध्ये समिती आपली कोणतीही भूमिका मांडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या दौर्यानंतर मुंबईत एक अंतिम बैठक होईल. त्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचीही भेट घेतली जाणार आहे. आम्ही लोकांचे म्हणणे ऐकून घेऊ आणि 5 डिसेंबरपर्यंत शिफारशींसह अंतिम अहवाल सरकारला सादर करू, असेही डॉ. जाधव यांनी नमूद केले.
त्रिभाषा सूत्र समिती दौर्याचे वेळापत्रक
8 ऑक्टोबर : छत्रपती संभाजीनगर, 10 ऑक्टोबर : नागपूर, 30 ऑक्टोबर : कोल्हापूर, 31 ऑक्टोबर : रत्नागिरी, 11 नोव्हेंबर : नाशिक, 13 नोव्हेंबर : पुणे आणि 21 नोव्हेंबर : सोलापूर