

मुंबई : पावसानंतर मोठ्या प्रमाणात मच्छरचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे पालिकेच्या कीटकनाशक विभागाने आतापासूनच कीटकनाशक व धूम्र फवारणीला प्राधान्य दिले आहे. यासाठी खाजगी संस्थांमार्फत प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
पाऊस पडल्यानंतर ठीक ठिकाणी साठणारी पाण्याची डबकी, टायर करवंट्या, झोपडीवर टाकण्यात आलेले प्लास्टिक, कचऱ्यामुळे होणारी घाण, इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेले विविध साहित्यात साठवून राहणारे पाणी यामुळे मच्छरचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने आतापासूनच खबरदारी घेतली आहे.
मच्छरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशक व धुम्रप्रवारणी करण्यासाठी पालिकेकडे कर्मचाऱ्यांची कमी संख्या असल्यामुळे प्रत्येक विभाग कार्यालयनिहाय कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कीटकनाशक फवारणी सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मच्छरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायफीनोथ्रीन सोल्यूशन या कीटकनाशक औषधाचा वापर करण्यात येत आहे. संपूर्ण मुंबईत याची फवारणी करण्यासाठी त्या त्या विभाग कार्यालयाला सायफीनोथ्रीन सोल्यूशनचा पुरवठा करण्यात आला आहे.
या औषध फवारणीमुळे मच्छरवर नियंत्रण येईल, असा दावा मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान आठवड्यातून किमान दोन वेळा धूम्र व कीटकनाशक फवारणी झालीच पाहिजे, असे निकष ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे दिलेल्या निकशाचे वेळेत पालन होत असल्याचे कीटकनाशक विभागाकडून सांगण्यात आले.