TET Paper Leak: पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द; आता पुन्हा परीक्षा कधी होणार? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra TET Paper Leak: भिवंडीत कथित पेपरफुटी उघड झाल्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात आली आहे.
TET Paper Leak
TET Paper LeakPudhari
Published on
Updated on

Maharashtra TET Paper Leak: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्याने राज्यभरातील लाखो उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) 28 जून रोजी होणारी परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्याने परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भिवंडीत उघडकीस आले पेपरफुटीचे प्रकरण

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात काही व्यक्तींकडे TET प्रश्नपत्रिकेतील प्रश्न असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोनगाव पोलिसांनी कारवाई करत संशयितांचा शोध सुरू केला. सुरुवातीला संशयित हॉटेलमधून पसार झाले होते. मात्र, तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी सहारा विमानतळ परिसरातून तिघांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या माहितीची परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न जुळत असल्याचे आढळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पुन्हा परीक्षा कधी होणार?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी नवीन तारखेचे नियोजन सुरू आहे.

त्यांच्या माहितीनुसार,

  • पुढील 2 ते 3 दिवसांत नव्या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल.

  • परीक्षा घेण्यासाठी किमान तीन आठवड्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

  • 6 लाख 12 हजारांहून अधिक उमेदवारांना पुन्हा अर्ज किंवा नोंदणी करण्याची गरज नाही.

  • उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

  • राज्यातील 37 शहरांतील 1,028 परीक्षा केंद्रांवरच पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.

TET Paper Leak
Badri Kedar Temple: राम मंदिरापाठोपाठ आता बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीवरही भ्रष्टाचाराचे आरोप, RTIमधून मोठा खुलासा

पेपरफुटीचं प्रकरण कसं उघडकीस आलं?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 28 जून रोजी राज्यभरात TET परीक्षा घेण्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था केली होती. मात्र, 27 जूनच्या पहाटे भिवंडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर संशयितांवर छापा टाकण्यात आला.

त्यानंतर परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संशयितांकडील माहितीची तपासणी केली असता, प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न त्यांच्याकडे आधीच उपलब्ध असल्याचे आढळले. यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

उमेदवारांनी घाबरून जाऊ नये

परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलं की, उमेदवारांचे कोणतेही नुकसान होणार नाही. सर्व पात्र उमेदवारांना नव्या तारखेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळेल. त्यामुळे उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना आणि अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा. दरम्यान, पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही परीक्षा परिषद आणि पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news