

Maharashtra Temperature: हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात येत्या ४८ तासात पारा चांगलाच घसरणार आहे. पुढचे दोन दिवस सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याची लाट वेगानं वाहत असल्यानं पुढील ४८ तासात महारष्ट्रात कडाक्याची थंडी पडणार आहे. हवामान विभागानं महाराष्ट्रातील तब्बल १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने राज्यातील १४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला आहे. यामध्ये जालना, गोंदिया, नागपूर, नाशिक, पुणे सह इतर जिल्ह्यांना थंडीचा मोठा फटका बसणार आहे. काही ठिकाणी १६ जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात थंडी जाणवत असली तरी, मुंबई शहरातही सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस मुंबई शहर आणि विविध जिल्ह्यांमध्ये प्रचंड कडाक्याची थंडी राहणार आहे. मुंबई शहरात दाट धुके पडण्याची शक्यता आहे, ही थंडी पुढील काही दिवस अशीच कायम राहण्याचा अंदाज आहे.
कडाक्याची थंडी असली तरी राज्यातील अनेक भागात लहान मुलांसह तरूण देखील या थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर मॉर्निंग वॉक अन् मैदानी खेळ खेळणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मोठ्या शहरात प्रदुषणामुळे लोकं हैराण झाली होती. त्यातच वादळी वातावरणाचा देखील त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला होता. व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण देखील वाढले होते. त्यामुळं कडाक्याच्या थंडीत आरोग्य सांभाळूनच आनंद लुटण्याचा तज्ज्ञ सल्ला देत आहेत.