

ST Bus
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका जारी केली आहे. मागील ४५ वर्षांचे अवलोकन केले असता केवळ ८ वर्षांत राज्य परिवहन महामंडळास काही प्रमाणात नफा झाला. उर्वरित वर्षात महामंडळास मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याचे निदर्शनास आणून देत श्वेतपत्रिका जारी करण्यात आली आहे.
एकीकडे महामंडळाने वाहनांची संख्या वाढवली आहे. तर दुसरीकडे तोटा वाढत गेला आहे. २०२३-२४ मधील महामंडळाचा संचित तोटा १०,३२२ कोटी रुपयांवर गेला आहे. २०१८-१९ मध्ये संचित तोटा ४,६०३ कोटी रुपये होता. हा तोटा सहा वर्षात दुपटीपेक्षा अधिक वाढला गेल्याचे गे श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.
राज्य शासनाने भांडवली अर्थसाह्यसोबतच वेळोवेळी महामंडळात महसुली अर्थसाहाय्यदेखील केलेले आहे. तरीही महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारली नसल्याचे दिसून आले आहे. २००१-०२ पासून २०२३-२४ दरम्यान राज्य शासनाने ६,३५३ कोटी भांडवली अंशदान रा. प. महामंडळास दिले आहे.
महामंडळाकडे २०२४-२५ मध्ये १५,७६४ वाहनांचा ताफा आहे. तर एसटी सेवेत ८६,३१७ कर्मचारी काम करतात. तर या वर्षात २१३ कोटी प्रवासी संख्या राहिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक सद्यस्थिती राज्यातील जनतेला तसेच शासन, राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी आणि इतर सामाजिक घटकांना अवगत करणे, हा श्वेतपत्रिका जारी करण्याचा उद्देश असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश एप्रिल महिन्यात दिले होते. त्यानुसार श्वेतपत्रिका जारी केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडे बसेसची कमतरता.
उपलब्ध असलेल्या बसेसचे आयुर्मान अधिक असणे.
अनिवार्य व तोट्यातील चालन
अनियमित भाडेवाढ
अवैध वाहतूक
उत्पन्नात वाढ होणाऱ्या उपाययोजना
१) रा.प. महामंडळाच्या ताफ्यात दरवर्षी ५००० नवीन बसेसचा समावेश करणे
२) रा.प. महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्वावरील हायटेक व्होल्वो बसेसचा समावेश करणे
३) रा.प. महामंडळाच्या जागांवर इंधन पुरवठादार कंपन्याकडून महसुली भागीदारी तत्वावर खासगी वाहनांसाठी किरकोळ इंधन विक्री केंद्र सुरु करणे
४) रा.प. महामंडळाच्या जागांचा बिओटी/पीपीपी तत्वावर विकास करणे
५) क श्रेणी फेऱ्यांचे रुपांतरण ब श्रेणी फे-यात तर ब श्रेणी फेऱ्यांचे रुपांतरण अ श्रेणी फेऱ्यांत करण्याचा प्रयत्न करणे
६) अचालनिय उत्पन्नात वाढ करणे
७) प्रवासी सोयी आणि सुविधा निर्माण करणे
८) उत्पन्न वाढीसाठी लक्षांक निश्चित करणे
रा. प. महामंडळाच्या खर्चात बचत करणाऱ्या योजना
१) रा.प. महामंडळाच्या ताफ्यात ५००० एल.एन.जी. इंधनावरील बसेसचा समावेश करणे
२) रा.प.महामंडळाच्या ताफ्यात १००० सीएनजी. इंधनावरील बसेसचा समावेश करणे
३) रा.प. महामंडळाच्या व्यवस्थापनासाठी आज्ञावली (ERP) विकसीत करणे
४) खर्चात बचतीच्या कामगिरीसाठी लक्षांक निश्चित करणे
प्रवासी सुरक्षितता सोयी उपलब्ध करुन देण्याबाबतच्या उपाययोजना
१) रा.प. महामंडळाच्या ताफ्यात ५३०० इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करणे
२) सवलतधारी प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) योजना राबविणे
३) तिकिटांसाठी इटीआयएम, ओआरएस प्रकल्प राबविणे
४) प्रवासी तसेच मालमत्ता सुरक्षिततेसाठी सीसीटिव्ही यंत्रणा बसविणे
५) अपघातांचे प्रमाण कमी करणे
६) दूर प्रवास करणाऱ्या विना सवलतधारी प्रवाशांना तिकिट दरात सवलत देणे
७) कर्मचाऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणे
एसटी महामंडळाकडे पूर्वी कामगार वर्ग मोठा होता. मात्र आता कामगार वर्ग ७९ हजार आहे. आधी १८,५०० गाड्या होत्या. पण नंतर काही बसगाड्या मोडकळीस आल्या. गळक्या आणि तुटक्या बसेस रस्त्यावर चालत होत्या. गेल्या १०- १२ वर्षात हा ग्राफ कमी होत होता. नवीन बसेस घेतल्या नाहीत. ३ ते ४ वर्षापूर्वी जर नवीन बसेस घेतल्या असत्या तर तोटा जास्त झाला नसता, असे एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
१० हजारचा तोटा कमी नाही. हा भरून काढणे कठीण आहे. २५ ते ३० हजार बसेस आहेत, त्याच्या जीवावर तोटा भरून काढू. ७७ वर्षाचा एसटी महामंडळाचा इतिहास आहे. गेल्या १०- १५ वर्षात हळूहळू ग्राफ कमी होत गेला. ३- ४ वर्षा पूर्वी सरकारने लक्ष दिलं असत तर ही वेळ आली नसती. मी मागणी केली आहे की दर वर्षाला ५ हजार बसेस आल्या पाहिजेत. जेणेकरून एसटी महामंडळ नफ्यात राहील. पुढच्या ३- ४ वर्षात एसटी तोट्यात राहणार नाही. एसटीची वस्तूस्थिती आज समोर ठेवली आहे. भाडे तत्वावर कोणतीही बस घेणार नाही. कंत्राट दराला फायदा होतो असे बोलले जाते. भरती प्रक्रिया भविष्यात करू. भविष्यात एसटी महामंडळ आर्थिक तोट्यातून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. १०० व्होल्व्हो बस आपण सुरू करतोय. कोणी काय केलं? या राजकारणात मला पडायचं नाही. भविष्यात एसटी महामंडळ कसं नफ्यात येईल? हे महत्वाचं आहे, असे सरनाईक यांनी नमूद केले आहे.