वीजहानी कमी करण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’ वर

वीजहानी कमी करण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’ वर
Published on
Updated on

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : सध्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ॲक्शन मोडवर येत महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. सध्या महावितरणच्या 16 परिमंडलातील 230 पेक्षा जास्त वाहिन्यांवर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत वीज चोरांविरुद्ध धडक कार्यवाही सुरू केली आहे.

या कारवाईत नादुरुस्त मीटर बदलणे, एरियल बंच केबल्स टाकणे, मल्टी मीटर बॉक्स बसविणे, कॅपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे इत्यादी कामे केली जाणार असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या अर्थ सहाय्याने महावितरणद्वारे राबविण्यात येणार असलेल्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचे मुख्य उद्दीष्ट हे वीजहानी कमी करण्याचे असून त्या अनुषंगाने महावितरणने धडक मोहीम राबविण्याचे ठरवले आहे. ही योजना जलदगतीने राबविण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये नियमीतपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना चांगली सेवा मिळावी. त्यातून महावितरणची आर्थिक परिस्थिती उंचवावी यासाठी वीजहानी कमी होणे आवश्यक आहे. त्यासाठी महावितरणने योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार महावितरणने यापूर्वीच राबविलेल्या  पुनर्रचित गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रम व एकात्मिक ऊर्जा विकास योजनांनी लाभान्वित झालेल्या शहरातील  विजेचा वापर जास्त असून काही ५० टक्क्यांहून जास्त वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वीजहानी कमी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सिंघल यांनी सांगितले आहे.

वीजहानीची कारणे व त्यानुसार उपाययोजना राबिवण्यासाठी वीज वाहिन्यांचे मीटरिंग सुस्थितीत आणणे, स्वयंचलित पद्धतीने घेण्यात आलेले रीडिंग अपलोड करणे, ग्राहकाला ज्या वितरण रोहित्रावरून वीजपुरवठा करण्यात येतो तेच रोहित्र बिलिंग प्रणालीमध्ये आहे किंवा नाही याची खातरजमा करणे आणि योग्य ऊर्जा अंकेक्षण करणे महत्वाचे आहे.

विजेची चोरी, अयोग्य मिटरिंग, अनधिकृत वीजपुरवठा किंवा वीज वाहिन्यावर असलेले आकडे, मीटर रीडिंगमधील त्रुटी, गुणक अवयव चुकीचे असणे आणि वीजबिलांमधील समस्या ही कारणे वाणिज्यिक हानी वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत, असे सांगून सिंघल म्हणाले की, वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येईल. नादुरुस्त मीटर तातडीने बदलण्यात येतील. तसेच मीटर रीडिंग अचूक राहील याची दक्षता घेण्यात येईल व वीजखांबावर मीटर बॉक्स बसविण्याचे काम या मोहीमेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सिंघल यांनी सांगितले.

जुनी झालेली पायाभूत सुविधा व उपकरणे, लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या, वीजभाराचे असंतुलन, उपकेंद्रांपासून दूर अंतरावर वितरण रोहित्र उभारणे, अतिभारीत वीजवाहिन्या आणि कमी दाबाचा वीजपुरवठा अशी विविध कारणे तांत्रिक हानी वाढण्यास कारणीभूत असून ही हानी कमी करण्यासाठी जुन्या वीजवाहिन्या व केबल बदलविणे, उच्च्चदाब वितरण प्रणालीचा वापर करणे, एरियल बंच केबल्स उपयोगात आणणे, कर्व्हड असलेल्या वीजतारांचा वापर करणे,  वीज वाहिन्यांचे विलगीकरण करणे, वितरण रोहित्रावरील प्रतिक्रियाशील ऊर्जा (रिॲक्टीव पॉवर) नियंत्रित करणे आणि उच्चदर्जाचे वितरण रोहीत्र वापरून तांत्रिक हानी कमी करण्याचे उद्दिष्ट या मोहीमेच्या माध्यमातून साध्य करण्यात येईल, असे विजय सिंघल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news