

मुंबई : दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 81 औद्योगिक करार झाले असून यामाध्यमातून महाराष्ट्रात तब्बल 37 लाख 27 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. या गुंतवणुकीच्या माध्यमातून 43 लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचेवळी थेट परकीय गुंतवणुकीचा वाटा 40 ते 50 टक्के असल्याचे सांगतानाच यासंदर्भातील सर्व पुरावे मुंबईत परतल्यावर सादर करू, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यातर्फे दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत प्रतिनिधीत्व करत आहेत. विविध उद्योगसमूहांकडून राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीबाबत मंत्री सामंत यांनी बुधवारी दावोस येथून माध्यमांशी संवाद साधला.
मागील वर्षीही महाराष्ट्र गुंतवणुकीत देशात पहिल्या क्रमांकावर होता आणि यंदा आम्ही आमचाच विक्रम मोडला आहे. आजपर्यंत 37 लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या आधारे 13 लाख रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला असून आणखी मोठ्या करारांची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले. उद्योग मंत्री म्हणून हा क्षण अत्यंत आनंददायी असून महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्याच्या दृष्टीने ही मोठी झेप आहे, असे सामंत यांनी नमूद केले.
उद्योग विभागाचे 51 करार
उद्योग विभागामार्फत 51 करार पूर्ण झाले असून त्यातून 16 लाख 69 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 19 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. याशिवाय एमएमआरडीए, सिडको यांसह इतर विभागांमार्फत 19 लाख 43 हजार कोटी रुपयांचे करार झाले असून त्यातून 22 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. आणखी एका टप्प्यात 1 लाख 15 हजार कोटींची गुंतवणूक आणि एक लाख 72 हजार रोजगार निर्माण होणार असल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.
राज्यात समतोल गुंतवणूक
राज्यातील उद्योग क्षेत्रात समतोल साधत नियोजनबध्द पध्दतीने गुंतवणूक करण्यात आली आहे. ही गुंतवणूक केवळ मुंबईपुणेपुरती मर्यादित नसून राज्याच्या सर्व भागांत उद्योग येतील याची काळजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आल्याचे सामंत यांनी अधोरेखित केले. सध्या होत असलेल्या गुंतवणुकीबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून राज्यातील उद्योजकांशी दावोसमध्ये करार का केले जात आहेत, असे प्रश्न विचारले जात आहेत.
याविषयी उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, एकूण गुंतवणुकीपैकी जवळपास 40 ते 50 टक्के गुंतवणूक ही थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आहे. यासंबंधी सर्व पुरावे मुंबईत आल्यानंतर सादर करण्यात येतील आणि कोणत्या उद्योगक्षेत्राध्ये किती परदेशी गुंतवणूक आहे, हे महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विभागवार गुंतवणूक
कोकण विभाग : 11 करार, सुमारे तीन लाख 10 हजार कोटी रुपये.
नागपूर विभाग : एक लाख 95 हजार कोटी
नाशिक विभाग : 30 हजार कोटी
छत्रपती संभाजीनगर : दोन करार, 17 हजार 700 कोटी
पुणे : चार करार, तीन हजार 250 कोटी
अमरावती : एक हजार कोटी
राज्यातील उद्योग क्षेत्रात समतोल साधत नियोजनबध्द पध्दतीने गुंतवणूक करण्यात आली आहे. ही गुंतवणूक केवळ मुंबई-पुणेपुरती मर्यादित नसून राज्याच्या सर्व भागांत उद्योग येतील याची काळजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आली आहे.
उदय सामंत, उद्योग मंत्री