

मुंबई: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यासाठी विविध रस्ते प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले आहेत. नागपूर-गोंदिया, नागपूर-चंद्रपूर, भंडारा-गडचिरोली हे तीन द्रुतगती महामार्ग बांधले जाणार आहेत.
समृद्धी महामार्गाच्या विस्ताराने विदर्भातील दळणवळण सुधारेल. तसेच नवेगाव-सुरजागड द्रुतगती महामार्गामुळे खनिज वाहतुकीला गती मिळेल. या चारही महामार्गांसाठी ४६ हजार कोटींहून अधिक खर्च येणार असून त्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
१५ दिवसांत या प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. नागपूर ते मुंबई या ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा कालावधी ८ तासांपर्यंत कमी झाला.
या महामार्गाचा विविध ठिकाणी विस्तार करून राज्यातील अधिकाधिक जिल्हे समृद्धीशी जोडण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर-गोंदिया, नागपूर -चंद्रपूर, भंडारा-गडचिरोली हे द्रुतगती महामार्ग बांधले जाणार आहेत.