

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठू लागला आहे. याचा परिणाम म्हणून २०२४च्या तुलनेत यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकांमधील आवाज पातळी कमी झाली होती; मात्र आवाजाची परवानगीयोग्य मर्यादा सर्वच ठिकाणी ओलांडली गेली.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान वांद्रे पश्चिम आणि वरळी येथे आवाजाची पातळी सर्वाधिक आढळून आली. वांद्रे पश्चिम येथे रात्री १०.०३ वाजता बँजो आणि लाऊडस्पीकरमुळे ९१ ते १०७.८ डेसिबल आवाज होता.
वरळी येथे रात्री १०.२८ वाजता केवळ ढोल-ताशांचा आवाज ९४ ते १०७ डेसिबलपर्यंत गेला होता. ऑपेरा हाऊस जंक्शन येथे संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी ९०.३ ते ९६.१ डेसिबलपर्यंत आवाज घुमत होता. ५.२८ वाजता हाच आवाज ८६ ते ९३.७ डेसिबल होता. याच ठिकाणी मध्यरात्री १२.०६ वाजता ८४.९ ते ८७ डेसिबल इतके ध्वनिप्रदूषण होते.
विसर्जनाच्या दिवशी सर्वाधिक गर्दी गिरगाव चौपाटी येथे होते. दक्षिण मुंबईतील लालबागचा राजा, गणेशगल्लीचा गणपती इत्यादी प्रसिद्ध आणि भव्य मूर्तींचे विसर्जन येथे होते. येथे संध्याकाळी ४.४१ वाजता आवाजाची पातळी ८०.४ ते ९१.४ दरम्यान होती. रात्री सव्वा अकराच्या सुमारास गिरगाव चौपाटी येथील आवाजाने ९२ ते १०३ डेसिबलपर्यंतची पातळी गाठली होती.
याच ठिकाणी मध्यरात्री १२.१८ वाजता आवाजाची पातळी ८७ ते ९४ डेसिबलपर्यंत आणि मध्यरात्री १२.३० वाजता ८२ ते ९० डेसिबलपर्यंत खाली आली होती. आवाज फाऊंडेशनद्वारे हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.
परवानगीयोग्य मर्यादेचे उल्लंघन
आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलअली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवाजाची परवानगीयोग्य पातळी दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री १० नंतर ४५ डेसिबल इतकी आहे. मात्र सर्वच ठिकाणी या मर्यादेचे उल्लंघन झाले.
गणेश मंडळांकडून जनरेटरच्या सहाय्याने ट्रकवर वाजवले जाणारे लाऊडस्पीकर यावर्षी कमी प्रमाणात होते; मात्र राजकीय पक्षांकडून लाऊडस्पीकरचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसून आला. गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे आवाजाची पातळी मोजता आली नव्हती. त्यापूर्वी २०२४ साली आवाजाची सर्वाधिक पातळी ऑपेरा हाऊस येथे ११५ डेसिबल होती.