Maharashtra Government Ganesh Visarjan Guidelines 2025
मुंबई : राज्य सरकारने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनाबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सहा फुटांपर्यंत उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आवश्यक व पुरेशी कृत्रिम तलावांची व्यवस्था उभी करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाने 2024 ची जनहित याचिका व इतर न्यायालयीन प्रकरणांवर 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार प्लास्टर ऑफ पॅरिस (पी.ओ.पी.) मूर्ती विसर्जनाबाबत सुधारित व एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना काटेकोरपणे करण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या हद्दीतील सार्वजनिक मंडळांना लहान आकाराच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याबाबत प्रोत्साहन द्यावे तसेच सार्वजनिक मंडळांमार्फत मोठ्या आकाराच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आल्यास सदर मूर्तीच्या ऐवजी विसर्जनासाठी प्रतीकात्मक स्वरुपात लहान मूर्तींचा वापर करण्याबाबत प्रोत्साहित करावे तसेच प्रतिष्ठापित मोठ्या मूर्तीचा वापर पुढील वर्षी करण्याकरिता देखील प्रोत्साहन द्यावे, असे नमूद करण्यात आले आहे.
सहा फुटांपर्यंत उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आवश्यक व पुरेशी कृत्रिम तलावांची व्यवस्था उभी करण्याची खबरदारी घ्यावी. सहा फूट उंचीपेक्षा कमी उंचीच्या सर्व मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांतच होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.