

Jayant Patil meets Devendra Fadnavis
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आणखी एक बडा नेता भारतीय जनता पक्षाकडे वाटचाल करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असतानाच, मंगळवारी मध्यरात्री उशिरा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासमवेत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली.
या चौघांमध्ये दीर्घकाळ चर्चा चालल्याने जयंत पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून ‘एनडीए’त सहभागी होतील, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यादृष्टीने हालचाली वाढल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये अस्वस्थता असून काही आमदार आणि खासदार सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देऊन ‘एनडीए’मध्ये सहभागी व्हावे, या विचाराचे आहेत. त्यातच परिसीमन विधेयकाबाबत शरद पवार गट सरकारला पाठिंबा देईल, अशी चर्चा सुरू आहे. पवार यांचा निर्णय होण्यासाठी जयंत पाटील मध्यस्थी करत आहेत की ते आधीच भाजपच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासंबंधी प्रफुल्ल पटेल यांनी काहीशी विरोधी भूमिका घेतल्यानंतर मंगळवारी झालेल्या या बैठकीला वेगळे महत्त्व आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षातील काही गोष्टी सोडवायला हव्यात, असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले. त्या पक्षात सगळे सुरळीत सुरू नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर परिसीमन विधेयकाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा देणे हे सुनेत्रा पवार यांना जड जाते आहे. हा संभाव्य पाठिंबा आपले महत्त्व कमी करेल असे पार्थ यांना वाटते, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय जनता पक्षाकडे वाटचाल करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जर ‘एनडीए’ला पाठिंबा देणार असेल, तर काही राजकीय चर्चा होतील, हे गृहीत धरले जाते आहे. ही भेट त्याचाच भाग मानली जाते. या पार्श्वभूमीवर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांच्यासह ‘वर्षा’वर जाण्यास वेगळे महत्त्व आहे.