

Cabinet Meeting Maharashtra
मुंबई : जिल्हा नियोजित समितीतील निधीवरून धाराशिव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पेटला असताना सर्वांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे, असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी धारशिवच्या दौर्यावर असताना केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. या वक्तव्याने नाराज झालेल्या शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त करीत नितेश राणेंना समज देण्यास सांगितले. त्यावर फडणवीस यांनी नितेश राणेंनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे टाळावे, असा सल्ला देत या विषयावर पडदा टाकला.
मंत्रिमंडळ बैठकीत ‘कोण कोणाचा बाप’ यावर चांगलीच चर्चा झाली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंत्री नितेश राणे यांची तक्रार करत त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला.
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील भाषणात शिवसेनेवर नाव न घेता टीका केली होती. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे, असे नितेश राणे म्हणाले होते.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या निधीवाटपाला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी शिवसेना मंत्र्यांना इशारा दिला. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे हे लक्षात ठेवा, असा दम नितेश राणेंनी दिला होता.