

मुंबई : पुढारी वृत्तसेवा जो मनाचा मोठेपणा बाळासाहेबांकडे होता तो उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील आहे. त्यांनी अजूनही तो दाखवावा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावेत, असे सांगताना या संघर्षाचा शेवट गोड होणार असल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार हवेत की आपले शिवसैनिक हवे आहेत याचाही निर्णय घ्यायला हवा, असेही केसरकर म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, कुटुंबप्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची मागणी आम्ही केली होती; पण उद्धव ठाकरे यांनी साथ सोडली नाही. शेवटपर्यंत शरद पवार त्यांना राजीनामा देऊ नका, असे सांगत होते. त्यामुळे उद्धव यांनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवायला हवे. शरद पवार हे त्यांच्यासाठी जवळचे झाले आहेत. आम्ही मात्र, त्यांना दूरचे झालो आहोत असे सांगून उद्धव ठाकरे यांनी आपले मन मोठे करावे, असेही केसरकर म्हणाले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आम्ही बोलणार नाही. आमच्या मित्रपक्षाने देखील त्यांच्यावर भाष्य करू नये, असेही त्यांनी सांगितले.
आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आम्हालाच नाहीतर सर्वांनाच दिलासा दिला असून न्यायालयाची भूमिका योग्य आहे, असे केसरकर यांनी सांगितले. शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही. अध्यक्षांची निवड झाली आहे. आतापर्यंत बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. अविश्वास ठराव असो, वा अपात्रतेचा विषय हे विषय आता निकाली निघाले आहेत. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून दूर करण्यासंबंधी सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. ती आता जवळपास निकालात लागली आहे. सेनेच्या याचिकेतल्या मुद्द्यांनाही आता अर्थ नाही, असे केसरकर यांनी सांगितले. विधिमंडळाला अनेक दिवस अध्यक्ष नव्हते. आता अध्यक्षांची निवड झाली असून सर्वांना त्यांचे आदेश मानावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक झाली. ही बैठक द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी होती असे मला कळले आहे. याचे आम्ही स्वागत करतो.
दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, असा प्रश्न विचारला असता मंत्रिमंडळ विस्तार होणार होता, पण राष्ट्रपती निवडणूक मधे आली ना! असे वक्तव्य केले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा 18 तारखेनंतर होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे गटातील अनेकांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार केला तर शिंदे गटातील आमदारांची नाहक नाराजी नको म्हणून हा विस्तार लांबणीवर टाकला जाऊ शकतो, अशीही एक चर्चा आहे.
हेही वाचा