

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी संपल्याने लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. शनिवारी उमेदवारांना चिन्ह वाटप होणार असल्याने आता प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी युती आणि आघाडी एकत्र आली असून काही महापालिकांमध्ये ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शनिवार (दि. 3) पासून ते येत्या 13 जानेवारीपर्यंत साधारणतः 35 सभांना संबोधित करणार आहेत. राज्यातील प्रत्येक महापालिकेच्या ठिकाणी ते प्रचारासाठी जाणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी संपल्याने लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. शनिवारी उमेदवारांना चिन्ह वाटप होणार असल्याने आता प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी युती आणि आघाडी एकत्र आली असून काही महापालिकांमध्ये ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे विचित्र समीकरणे तयार झाली आहेत.
मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली, कोल्हापूर, नागपूर, वसई - विरारसह जवळपास 11 महापालिकांमध्ये भाजपा आणि शिवसेना युती झाली आहे. तर दोन महापालिकांमध्ये या युतीसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या निवडणुकीत मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा - शिवसेना युती विरुद्ध उद्धव आणि राज ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे अशी लढत आहे. त्याचवेळी नवी मुंबईत भाजपाला एकनाथ शिंदे यांची शिवसेना भिडणार आहे. मीरा भाईंदरमध्येही भाजपा विरुद्ध शिंदे सेना आणि काँग्रेस अशी लढत आहे. वसई विरार महापालिकेत भाजपा - शिवसेना युती माजी आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीशी मुकाबला करणार आहे. तर पनवेल महापालिकेत भाजपा विरुद्ध शेकाप अशी लढत आहे.
पुणे आणि पिंपरी - चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. त्यांचा सामना भाजपाशी आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड महापालिकेत भाजपा - शिवसेना युती तुटली आहे. त्यामुळे सत्तेतील दोन पक्ष येथे एकामेकांच्या विरोधात लढणार आहेत. त्याचवेळी परभणीत ते एकत्र आले आहेत. विदर्भात नागपूरमध्ये भाजपाने शिंदेंना सोबत घेतले असताना अमरावतीमध्ये मात्र युती तुटली आहे. नाशिकमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना - राष्ट्रवादी युती असा सामना रंगणार आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरच महापालिकांच्या निवडणुकीत बहुरंगी लढती लढल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस घेणार 11 दिवसांत 35 सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शनिवार (दि. 3) पासून ते येत्या 13 जानेवारीपर्यंत साधारणतः 35 सभांना संबोधित करणार आहेत. राज्यातील प्रत्येक महापालिकेच्या ठिकाणी ते प्रचारासाठी जाणार आहेत. काही मोठ्या शहरांमध्ये दोन सभा होतील. मुंबईत तीन ते चार सभा होण्याची शक्यता आहे. जिथे भाजप-शिवसेना युती आहे तेथे संयुक्त प्रचार सभांचे आयोजन केले जाणार आहे. यातील पहिली संयुक्त सभा शनिवारी वरळी येथील डोम परिसरात होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेली विकासकामे आणि शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत या कामांना मिळालेली गती हे शनिवारी होणाऱ्या प्रचार सभेचे प्रमुख मुद्दे राहतील. विकासाच्या अजेंड्यावर मते मिळवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच जाहीर केले आहे. ते राज्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सभा घेणार आहेत.
एकनाथ शिंदे घेणार 45 सभा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात 40 ते 45 सभा घेणार असल्याचे समजते. ते त्यांच्या पक्षातील सर्वाधिक महत्त्वाचे आणि लोकप्रिय नेते असल्याने पक्षाच्या प्रचाराची मदार त्यांच्यावरच आहे. या प्रचारांतर्गत ते ठिकठिकाणी जाऊन विकासकामांबाबत सांगतील. शिंदे सकाळी मुंबईबाहेर व संध्याकाळच्या सुमारास मुंबई परिसरात सभा घेतील. या प्रचारदरम्यान शिंदेचे दहा ते पंधरा रोड शोही आयोजित केले जातील.