

मुंबई / ठाणे : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अंदाजे सरासरी 57 टक्के मतदान झाले असून, 15 हजार 908 उमेदवारांचे नशीब ‘ईव्हीएम’बंद झाले आहे. आता शुक्रवारी 16 जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून 2 हजार 869 विजयी नगरसेवक गुलाल उधळतील.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी रात्री उशिरापर्यंत हाती आलेली नव्हती. मात्र अंदाजे 54 पर्यंत मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तो खरा ठरल्यास 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तुलनेत मुंबईत यावेळी मतदानाची टक्केवारी किमान दोन टक्क्यांनी घसरल्याचे म्हणता येईल. 2017 मध्ये 55.53 टक्के मतदान झाले होते.
गुरुवारी सकाळपासूनच मुंबईत मतदानाचा फारसा उत्साह दिसला नाही. सकाळी 11.30 पर्यंत फक्त 17.73 टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत 29.30 टक्के, तर दुपारी 3.30 पर्यंत 41 टक्के मतदान झाल्याचे आयोगाने जाहीर केले. त्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा हा टक्का किती झाला हे आयोगाला रात्री उशिरापर्यंत सांगता आले नाही.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले. ठाणे महापालिकेत सुमारे 55 टक्के, कल्याण- डोंबिवली सुमारे 50 टक्के, मिरा-भाईंदर सुमारे 48 टक्के, भिवंडी सुमारे 51 टक्के, उल्हासनगर सुमारे 44 टक्के आणि नवी मुंबईत सुमारे 58 टक्के मतदान झाले.
मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांतील मतमोजणीसाठी 23 केंद्रे सज्ज केली आहेत. शुक्रवारी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होईल. एका केंद्रात एकावेळी दोन प्रभागांची मतमोजणी होईल. त्यामुळे दुपारी बारापर्यंत पहिला निकाल हाती येऊ शकतो. मात्र ही मतमोजणी सायंकाळी उशिरापर्यंत चालेल, असाही अंदाज आहे.