

Marker Pen Controversy In BMC Election: राज्यात आज २९ महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे. मात्र या मतदानावेळी वापरण्यात आलेल्या मार्कर पेनवरून प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. लोकांना मतदान केल्यची निशाणी म्हणून बोटावर मार्कर पेनने मार्क करण्यात आले होते. यंदा पारंपरिक शाईच्या ऐवजी मार्कर पेन वापरण्यात आले होते. मात्र यामुळं दिवसभर वाद निर्माण झाल्यावर आता राज्य निवडणूक आयोगानं या मार्कर पेनबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
मात्र या मार्कर पेनने केलेला मार्क हा नुसत्या पाण्याने, थिनरने किंवा सॅनिटायझरने जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. अनेक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी निवडणूक आयोगाला यावरून फैलावर घेतले. बोगस मतदान करण्यासाठी पोषक अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यानं विरोधकांनी कडाडून टीका केली.
दरम्यान, सामन्य नागरिकांकडूनही तशा तक्रारी आल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असून पुढच्या निवडणुकीत मार्कर पेन ऐवजी पारंपरिक शाईच वापरण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, मार्कर पेनने लावलेली शाई लगेच जात असल्याचे निदर्शनास आल्यावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी राज्य निडवणूक आयोगावर टीका केली होती. त्यांनी निवडणूक आयोगासोबतच सत्ताधाऱ्यांवर निवडणुकीत गोंधळ घालण्याच्या उद्येशानेच हे करण्यात आल्याचा दावा केला होता.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपच्या नेत्यांनी विरोधकांना आपला पराभव दिसू लागल्यानं ते उद्या पराभवाचं खापर कशावर फोडायचं याची तयारी करत असल्याची टीका केली होती.
तर एकनाथ शिंदे यांनी मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांनी मार्करची शाई जात नाही असं सांगितले आहे असं वक्तव्य केलं होतं.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी स्वतः प्रयोग करून आपल्या बोटावरील शाई काढून दाखवली. अनेक प्रत्रकारांनी देखील हा प्रयोग करून पाहिला. तर ती शाई नुसत्या सॅनिटायझरने देखील पूर्णपणे नाहीशी होत होती. यावरून राज्यात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. आधीच मुंबईत पाडू मशिन लावल्यानं निवडणूक आयोग विरोधकांच्या रडारवर होते. त्यात आता नाहीशी होणारी शाई यामुळे आगीत तेल ओतल्याचा प्रकार झाला.