

Maharashtra Assembly Monsoon Session
मुंबई : राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून मोठे भ्रष्टाचार सुरू आहेत. त्यामुळे चहापानाला जाणं पाप ठरेलं, असं म्हणत अधिवेशनाआधीच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला रविवारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीकास्त्र सोडले.
आम्हाला चहापानाचं निमंत्रण मिळालं आहे. परंतु राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. सरकारमध्ये तीन पक्षांची तोंडे तिन्हीकडे आहेत. मराठी भाषेवर अन्याय करत हिंदीची सक्ती केली जात आहे. सरकारमधील मंत्री भ्रष्टाचार करत आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांची मस्ती वाढली आहे. ही अनेक प्रकरणे बघता मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
चहापानाला जायचं की नाही, याचा आम्ही विचार करत होतो. पण चहापानाला जाणं पाप ठरेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दोन गद्दार गँग आणि भाजपचे तीन दिशेला तीन तोंड आहेत. त्यांच्यात संवादाची गरज आहे. चहापानाच्यावेळी मुख्यमंत्री अनेकांना बघतील आणि म्हणतील की, यांच्यावरच मी आरोप लावले होते. 'ना खाता हू, ना खाणे देता हू' हे भाजपचे ब्रिदवाक्य होते, आता काय झाले? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
सरकार शेतकऱ्यांचे अपमान करणारे आहे. लोणीकर यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. टक्केवारीसाठी सरकार भांडत आहे. सरकार एकमेकांच्या निधीवर डोळे ठेवून आहे. दोन वर्षापासून एकही पैसा सरकारकडून शेतकऱ्याला मिळाला नाही. अनेक प्रश्न आहेत, ज्यात सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळेच चहापानाच्या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकायचं ठरवले आहे, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.