

मुंबई: महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणुकीत राज्यभरातून अत्यंत कमी मतदान झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. एकूण 1.23 लाख नोंदणीकृत मतदारांपैकी केवळ 14,817 डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मतदानाची टक्केवारी केवळ 12.04% इतकीच राहिली आहे.
या निवडणुकीत मुंबईत सर्वात कमी प्रतिसाद मिळाला याठिकाणी केवळ आठ टक्के डॉक्टरांनी मतदान केले, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक 33 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे भंडारा, गोंदिया, नंदुरबार, वाशीम, सातारा, रायगड आणि अहमदनगर या आठ जिल्ह्यांमध्ये एकही मत नोंदवले गेले नाही.
राज्यभरात नऊ जागांसाठी सुमारे 60 उमेदवार रिंगणात असून, विविध पॅनलमध्ये चुरशीची लढत होती. इंडियन मेडिकल असोसिएशनशी संबंधित पॅनल्ससह तीन प्रमुख गट आणि काही अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अंतर्गत मतभेदही उघड होत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत जे.जे. रुग्णालय आणि वाकोला येथे मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असली तरी दिवसभरात डॉक्टरांचा प्रतिसाद अत्यल्प राहिला.
पुणे (1798), नागपूर (1327), नाशिक (1268), ठाणे (1026), छत्रपती संभाजीनगर (1033) अशा काही शहरांत तुलनेने अधिक मतदान झाले, तरी एकूण चित्र निराशाजनकच राहिले. मतदान प्रक्रियेदरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदान सुरळीत पार पडले. मतमोजणी बुधवारी हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये होणार असून त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.