

मुंबई : दहा हजारांची लाच घेताना मुंबई विद्यापीठाच्या वरिष्ठ लिपिक निकिता विजय राठोड हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मार्कलिस्ट देण्यासाठी तिने 55 हजाराची मागणी करुन पंधरा हजार रुपये घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तक्रारदार मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी असून अलीकडेच त्याने बी कॉमची परीक्षा दिली होती. या परीक्षेची मार्कलिस्ट मिळावी यासाठी त्याने मुंबई विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज भवन, निकाल कक्षेत अर्ज केला होता. मार्कलिस्ट देण्यासाठी कक्षेच्या वरिष्ठ लिपिक निकिता राठोड हिने 55 हजारांची मागणी करुन पंधरा हजाराची लाचेची रक्कम घेतली होती.
उर्वरित रकमेसाठी ती त्याच्याकडे सतत तगादा लावत होती. त्यामुळे त्याने तिची भेट घेऊन तिला आणखीन पंधरा हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची 10 डिसेंबरला शहनिशा करण्यात आली होती. त्यात निकिताने पंधरा हजारांची लाचेची मागणी करुन दहा हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी मुंबई विद्यापीठात सापळा लावून निकिता राठोड हिला दहा हजारांचा हप्ता घेताना रंगेहाथ पकडले.
तिच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 7 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यात नंतर तिला पोलिसांनी अटक केली. या कारवाईने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.