

मुंबई : दहावीचा निकाल लागून आठ दिवस उलटले, तरी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक संभ्रमात असून प्रवेश प्रक्रियेच्या प्रारंभाकडे डोळे लावून बसले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आयटीआय प्रवेशासाठी अर्जांची संख्या सातत्याने घटत असल्याचे चित्र समोर आले आहे. 2023 मध्ये 2 लाख 93 हजार 479 अर्ज प्राप्त झाले होते. 2024 मध्ये ही संख्या 2 लाख 66 हजार 290 वर घसरली, तर 2025 मध्ये केवळ 2 लाख 46 हजार 12 अर्ज नोंदवले गेले.
म्हणजे दोन वर्षांत जवळपास 47 हजार अर्जांनी घट झाली आहे. वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर प्रवेश गेल्यावर्षी वाढले होते. अशा परिस्थितीत यंदा होणारी प्रवेश प्रक्रिया अधिक वेगवान करण्याची गरज असताना यंदा प्रवेशच रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
राज्यातील आयटीआय प्रवेश, संस्था संलग्नता आणि तासिका तत्त्वावरील नियुक्ती प्रणाली खासगी संस्थेकडून विकसित केली जात असल्याचे सांगत ती जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडे देण्यात आली आहे. यासाठी तब्बल 1 कोटी 87 लाख 20 हजार रुपयांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र आधीपासून कार्यरत असलेली प्रणाली असताना विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडवून नवा प्रयोग करण्याची गरज नेमकी आत्ताच का निर्माण झाली, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
आतापर्यंत प्रवेश प्रक्रिया संचालनालयाच्या थेट नियंत्रणाखाली होती. त्यामुळे तांत्रिक अडचणी, डेटा व्यवस्थापन, प्रवेशातील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर तत्काळ निर्णय घेणे शक्य होत होते. मात्र आता ही संपूर्ण यंत्रणा मंडळामार्फत विकसित केली जाणार आहे. हा निर्णय खरोखर विद्यार्थीहितासाठी घेतला गेला की एका विशिष्ट अधिकाऱ्याच्या आग्रहाखातर संपूर्ण प्रणालीचे नियंत्रण मंडळाकडे वळविण्यात आले, याबाबत विभागात तीव्र चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, संचालनालयाच्या ई-प्रशासन समितीने यापूर्वी एकात्मिक आणि केंद्रीकृत डिजिटल प्रणाली उभारण्याची स्पष्ट शिफारस केली होती. प्रवेश, परीक्षा, अप्रेंटिसशिप, प्रमाणपत्र, प्लेसमेंट आणि वित्तीय व्यवस्थापन अशा 91 मॉड्यूल्सचा समावेश असलेली व्यापक प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव होता. मात्र शासन निर्णयात या दृष्टीकोनाकडे दुर्लक्ष करून तुकड्या-तुकड्यांत प्रणाली विकसित करण्याचा मार्ग स्वीकारण्यात आल्याने विभागातच नाराजी पसरली आहे.
दरम्यान, कौशल्य विकास विभागाने तातडीने वेळापत्रक जाहीर करून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी जोरदार मागणी आता विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. याबाबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.