Paper Leak Case | ‘परीक्षेतील गैरव्यवहार’ शिक्षणव्यवस्थेला पोखरून काढणारी वाळवी

स्पर्धा परीक्षांपासून ते अगदी शालेय स्तरापर्यंत पेपरफुटीच्या गैरप्रकारांनी आपले हातपाय पसरले
Paper Leak Case
Paper Leak Case | ‘परीक्षेतील गैरव्यवहार’ शिक्षणव्यवस्थेला पोखरून काढणारी वाळवी
Published on
Updated on

राजेंद्रकुमार चौगले

कोल्हापूर : एखाद्या मोठ्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी येते आणि लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर होतो. वर्षांनुवर्षे केलेला अभ्यास, आई-वडिलांनी घेतलेले कष्ट आणि उज्ज्वल भविष्य, आशा एका क्षणात धुळीस मिळते. परीक्षेतील गैरव्यवहाराची ही घटना आता केवळ अपवादात्मक राहिलेली नाही, तर ती एक संघटित गुन्हेगारी आणि शिक्षणव्यवस्थेला पोखरून काढणारी वाळवी बनली आहे.

स्पर्धा परीक्षांपासून ते अगदी शालेय स्तरापर्यंत या गैरप्रकारांनी आपले हातपाय पसरले असल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील सोनगे येथे टीईटी परीक्षेचे पेपर फोडण्याच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा वास्तव समोर आल्यामुळे गुणवत्तेच्या आणि प्रामाणिकपणाच्या मूल्यांवरच थेट हल्ला चढवला आहे.

देशाच्या भविष्याशीच होतो खेळ

या गैरव्यवहारांचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होते. त्यांच्या मनात व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि चीड निर्माण होते. दुसरीकडे, अपात्र आणि अयोग्य उमेदवार पैसे आणि वशिल्याच्या जोरावर महत्त्वाची पदे पटकावतात. अशाने डॉक्टर, अभियंता, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर अकार्यक्षम व्यक्ती आल्यास संपूर्ण समाजाला त्याची मोठी किंमत मोजावी लागते. यातून केवळ पदव्यांचे अवमूल्यन होत नाही, तर देशाच्या भविष्याशीच खेळ केला जातो.

अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास 70 टक्के विद्यार्थ्यांना अडचण

थोडक्यात, परीक्षेतील गैरव्यवहार हा केवळ काही विद्यार्थ्यांचा किंवा दलालांचा प्रश्न नाही, तर ही आपल्या शिक्षणव्यवस्थेच्या आणि पर्यायाने समाजाच्या नैतिकतेच्या पायाला लागलेली वाळवी आहे.

या वाळवीचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर गुणवत्तेचा हा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही आणि त्याचे पडसाद पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतील. एका अनौपचारिक सर्वेक्षणानुसार, पेपरफुटीच्या घटनांमुळे 80 टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दलची गंभीरता कमी झाली आहे.

70 टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासावरील लक्ष केंद्रित करण्यास अडचण येत आहे. अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेसाठी प्रवास आणि इतर खर्चांपोटी हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.

जिल्हास्तरीय केंद्रांपासून परीक्षा केंद्रांपर्यंतचा प्रवास

परीक्षेच्या दिवशी किंवा एक दिवस अगोदर मुख्य केंद्रावरून हे सीलबंद बॉक्स प्रत्येक परीक्षा केंद्रावर पाठवले जातात. या प्रक्रियेत सामील असलेले केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक किंवा स्थानिक अधिकारी हे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असू शकतात. महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित टीईटी घोटाळ्यामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांचाच सहभाग असल्याचे समोर आले होते, जे व्यवस्थेतील धोक्याची जाणीव करून देते.

मुख्य मुद्दे

पूर्वीची कॉपी करण्याची पद्धत साधीहोती.

आज नकल करण्याचे स्वरूप अत्याधुनिक, भयावह बनले.

पेपर फोडणार्‍या टोळ्यांचे जाळे सक्रिय.

इलेक्ट्रॉनिक साधनांचा गैरवापर वाढला आहे.

डमी उमेदवार, उत्तरपत्रिका बदलणे इ. प्रकार घडताहेत.

परीक्षा केंद्रातील काही अधिकारीही याश्र सामील होताहेत.

हे फक्त विद्यार्थ्यांच्या अप्रामाणिक वर्तनाचे प्रकरण नाही.

यामागे पैशांचे व्यवहार असलेले मोठे रॅकेट कार्यरत आहे.

शिक्षणाचे बाजारीकरण वाढल्याने ही समस्या गंभीर.

नोकरीसाठी लागलेल्या अतिशय स्पर्धेमुळे या गैरप्रकारांना प्रोत्साहन मिळते.

मार्क्स हेच यशाचे एकमेव मापदंड बनल्याने चुकीचे मार्ग स्वीकारले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news