

मुंबई : देशातील बहुतांशी भागात सूर्य आग ओतत आहे. राज्यातील गेल्या काही दिवसांपासून उष्ण आणि दमट हवामान आहे. उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. दरम्यान पुढील चार दिवस राज्यातील काही भागातील तापमान ४३ अंशावर पोहचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने आज (दि.२९) वर्तवली आहे.
पुढील ४ दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानाचा पारा चढण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तापमान ३९ ते ४३ पर्यंत, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तापमान ३८ ते ४१ पर्यंत वाढेल. पुढील ४ दिवसात १ ते २ अंश सेल्सिअस वाढेल त्यानंतर ते २ ते ३ अंशाने कमी होईल. मराठवाड्यात देखील तापमान ४० ते ४३ अंशापर्यंत जाईल, अशी शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. दरम्यान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात पुढील ४ दिवस उष्ण आणि दमट परिस्थिती असणार आहे, असे देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
मध्य महाराष्ट्र (उष्ण आणि दमट परिस्थिती)
30 एप्रिल 2025: पुणे, सातारा, सोलापूर.
01 मे 2025: पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर.
मराठवाडा (उष्ण आणि दमट परिस्थिती)
29 एप्रिल 2025: बीड, धाराशिव, लातूर.
30 एप्रिल 2025: परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, बीड.
01 मे 2025: परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, छत्रपती संभाजी नगर, बीड.