

मुंबई : राज्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विशेष फेरी-१ उद्या पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या विशेष फेरीला सुरुवात होणार आहे. १५ जुलैपासून राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये नियमितपणे सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १० लाख ७३ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. विशेष फेरी-१साठी ४ लाख ८४ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ पूर्ण करून पसंतीक्रम निश्चित केला होता. त्यापैकी ३ लाख ९२ हजार ६९३ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप करण्यात आले.
विशेष फेरी-१मध्ये आतापर्यंत एकूण ३ लाख २४ हजार १०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून ३ लाख १२ हजार ९८३, तर कोटा प्रवेशातून ११ हजार ११९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मुंबई विभागात सर्वाधिक ५७ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, त्यापाठोपाठ पुणे विभागात ६४ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याने या फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या फेरीचा उद्या (९ जुलै) शेवटचा दिवस असणार आहे.
दुसरी विशेष फेरीसाठी १० जुलै रोजी सकाळी १० वाजता रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर १० जुलै सकाळी ११ वाजल्यापासून ११ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी आणि अर्जातील दुरुस्ती करता येणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे.
१२ जुलै रोजी जागावाटप प्रक्रिया पार पडेल, तर १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता विशेष फेरीतकिती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले ही जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात १३ जुलै सकाळी ११ ते १४ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यानंतर १४ जुलै रोजी पुढील विशेष प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
मुलींसाठी विशेष फेरी
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान मुलींसाठी विशेष प्रवेश फेरीचे आयोजन केले असून संबंधित फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या विशेष फेरीअंतर्गत नव्याने अर्ज करणाऱ्या तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना १० आणि ११ जुलै रोजी अर्ज नोंदणी, भाग-१ मधील दुरुस्ती, पसंतीक्रम भरणे आणि अर्ज लॉक करण्याची संधी देण्यात आली आहे. या फेरीसाठी १२ जुलै रोजी अलॉटमेंट प्रक्रिया पार पडणार असून १३ जुलै रोजी महाविद्यालय वाटपाची यादी आणि कटऑफ जाहीर करण्यात येणार आहे.