

मुंबई: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व संस्थांचा पसंतीक्रम भरण्यासाठी मंगळवार (२३ जून) हा अखेरचा दिवस आहे.
२१ मेपासून सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांनी अद्याप पसंतीक्रम भरलेला नाही. या विद्यार्थ्यांनी आज न भरल्यास पहिल्या प्रवेश फेरीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य दिले जात असल्याने यंदा काही नवीन व्यवसाय अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे वळावे, यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) २१ मेपासून प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. यंदा राज्यातील शासकीय व खासगी आयटीआयमध्ये मिळून १ लाख ५७ हजार ६६४ प्रवेशक्षमतेच्या जागा उपलब्ध आहेत.
प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत २१ जून रोजी संपली असून राज्यभरातून १ लाख ८९ हजार ७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ६० हजार ४३३ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत.
अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना २३ जूनपर्यंत पसंतीक्रम भरण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत केवळ १ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनीच सोमवारपर्यंत पसंतीक्रम भरला आहे.
यामुळे अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांनी अद्याप पसंतीक्रम नोंदवलेला नाही. पसंतीक्रम न भरणारे विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादीसाठी पात्र ठरणार नसल्याने त्यांना पहिल्या प्रवेश फेरीत संधी मिळणार नाही.
परिणामी, पसंतीच्या अभ्यासक्रमासाठी त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये अधिक स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. आयटीआयची अंतिम गुणवत्ता यादी २८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील १ लाख ५१ हजार ५६ जागांसाठी २ लाख ४६ हजार १२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ३० हजार ७४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता.
यंदा प्रवेश क्षमता वाढून १ लाख ५७ हजार ६६४ झाली असली, तरी उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जदारांची संख्या अधिक असल्याने अनेक लोकप्रिय व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये स्पर्धा कायम राहण्याची चिन्हे आहेत.