

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यात तीन हजार 485 अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
तपासणीमध्ये दूध, खवा, मावा, खाद्यतेल, तूप, मिठाई, ड्रायफ्रूटस्, चॉकलेटस्, भगर व अन्य अन्नपदार्थांचे एकूण 4 हजार 676 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या तपासणीत अनियमितता आढळलेल्या एक हजार 431 आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली असून 48 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एका आस्थापनाचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
जनतेस सुरक्षित, दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, राज्यमंत्री योगेश कदम, सचिव धीरज कुमार व आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात सणासुदीच्या कालावधीत अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी अभियान 25 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येत आहे.