

जळगाव : दिवाळसणात अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (FDA) जिल्ह्यात विविध ठिकाणांहून अन्न नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.
शहरातील विविध ठिकाणावरुन एकूण ११३ नमुने घेण्यात आले असून, त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवाल आल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी दिली.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात विभागाने दिवाळीपूर्व काळात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवली. भेसळ रोखण्यासाठी दूध, खवा, तूप, मिठाई, ड्रायफूड, मसाले, खाद्यतेल आणि इतर पदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. मात्र, १६ ऑक्टोबरपर्यंत लॅब अहवाल प्राप्त न झाल्यामुळे पुढील कारवाई अडचणीत आली आहे.
जिल्ह्यात घेतलेले नमुने असे... (एकूण – 113)
दूध – 14
खवा/मावा – 6
तूप – 6
खाद्यतेल – 19
ड्रायफूड – 6
चॉकलेट – 9
मिठाई – 24
भगर – 7
इतर – 22
नमुने घेतल्यानंतर लगेचच वस्तू सील करण्याची कायद्यानुसार तरतूद नाही. मात्र, तपासणी अहवालात भेसळ आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच या मोहिमेमुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना सुरक्षित आणि शुद्ध अन्नपदार्थ मिळावेत, हा उद्देश आहे.
संतोष कांबळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त