Maharashtra FDA Action: राज्यातील चौदा अन्न व्यवसाय परवाने रद्द; ऑनलाइन अन्नविक्री केंद्रांसह हॉटेलांवर कारवाई

८६ आस्थापनांची तपासणी
Maharashtra FDA Action
Maharashtra FDA ActionPudhari
Published on
Updated on

मुंबई: राज्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. ऑनलाइन माध्यमातून अन्नपदार्थांची विक्री व वितरण करणाऱ्या ८६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६० सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून १४ अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.

कोकण विभागात दोन आस्थापनांवर कारवाई करून १४ हजार १६७ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. पुणे विभागात तीन आस्थापनांवर कारवाई करून ७ हजार ५९३ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर विभागात ४३ लाख ६६ हजार ८४७ रुपये, तर नागपूर विभागात २ लाख ८८ हजार २४ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.

Maharashtra FDA Action
Census 2027 Questions: जातनिहाय जनगणनेसाठी 40 प्रश्न; आधार, मोबाईलसह लसीकरणाचीही माहिती

अन्नपदार्थांची सुरक्षित साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, अन्नपदार्थांची कालमर्यादा, योग्य पद्धतीने साठवणूक तसेच आवश्यक अन्न सुरक्षा नोंदींची तपासणी या मोहिमेत करण्यात आली.

पुणे विभागात ब्लिंकिट स्टोअर, कराड (सातारा), झेप्टो लिमिटेड, लोहेगाव, स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड, वारजे जकात नाका, ब्लिंकिट स्टोअर, नऱ्हे-सिंहगड रोड या आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

लोहेगाव येथील झेप्टो आस्थापनेत शीतगृह व गोठविलेल्या अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी आवश्यक तापमान न राखणे, वापरण्याची अंतिम तारीख उलटून गेलेले पदार्थ साठवणे, अन्नपदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक न करणे, अस्वच्छता आणि कीटक नियंत्रणातील त्रुटी आढळल्याने परवाना निलंबित केले.

नऱ्हे येथील ब्लिंकिट स्टोअरमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या निर्धारित निकषांचे उल्लंघन आढळले. कराड येथील ब्लिंकिट स्टोअरमध्ये वितरणासाठी कार्यरत १२५ दुचाकीस्वारांकडे ओळखपत्रे तसेच वैद्यकीय तंदुरुस्तीच्या नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे त्रुटींची पूर्तता होईपर्यंत दुचाकींच्या माध्यमातून व्यावसायिक कार्यवाही थांबविण्याचे निर्देश देण्यात आले.

Maharashtra FDA Action
Mumbai Water Crisis: मुंबईत पाणीबाणी! पाण्यासाठी मुंबईकरांची धावपळ

रायगडमध्ये ६९८ लिटर संशयित निकृष्ट दूध जप्त

‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत रायगडमधील तळोजा येथे मे. मातेश्वरी फूड्सच्या वाहनातून ६९८ लिटर संशयित निकृष्ट दर्जाचे पाश्चराइज्ड गायीचे दूध जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत ३४ हजार ३०२ रुपये आहे. संबंधित व्यवसाय विना नोंदणी सुरू असल्याचेही आढळले.

नाशिकमध्ये तीन हॉटेलांवर कारवाई

नाशिकमधील हॉटेल वास्को, सेलेब्रिटा रेस्टॉरंट अँड बँक्वेट्स आणि हॉटेल माऊली या तीन आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तिन्ही ठिकाणी स्वयंपाकघर, अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता आणि अन्न हाताळणीसंबंधी नियमांचे उल्लंघन आढळले.

झेप्टो, सीआयडीसीओ केंद्रात रॅकखाली व अन्नपदार्थांच्या आसपास झुरळांचा मुक्त वावर आढळला. अनेक रॅक गंजलेल्या अवस्थेत होते. वितरण कर्मचारी रस्त्यावर वापरली जाणारी पादत्राणे घालून चिखल व घाण तुडवत आस्थापनेत प्रवेश करत असल्याने अन्नपदार्थ दूषित होण्याचा धोका असल्याचे आढळले.

तब्बल ४६.८९ लाखांचा माल जप्त

राज्यभरातील कारवाईत एकूण १५ धाडी टाकण्यात आल्या. प्रतिबंधित व इतर अन्नपदार्थ मिळून ४६ लाख ८९ हजार ६०३ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न मिळावे यासाठी तपासणी मोहीम सुरूच राहणार असून, निकृष्ट, भेसळयुक्त किंवा नियमबाह्य अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news