

मुंबई: ब्रिटिश राजवटीत १९३१ मध्ये शेवटची सर्वसमावेशक जातनिहाय जनगणना जाहीर झाली होती. त्यानंतर स्वतंत्र भारतात प्रथमच जातनिहाय जनगणना होणार असून, त्यासाठी ४० प्रश्नांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
यात लोकांना एससी, एसटी किंवा इतर जातींबद्दल विचारले जाईल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्व समुदायांच्या जातीची माहिती जनगणनेत नोंदवली जाईल.
यापूर्वी २०११ च्या जनगणनेच्या फॉर्ममध्ये २९ प्रश्न होते. यात जातीशी संबंधित माहितीसाठी फक्त एससी, एसटीचा पर्याय होता. आता जनगणना-२०२७ च्या प्रश्नांच्या यादीत जातीशी संबंधित प्रश्न क्रमांक १० वर आहे, ज्यात एससी, एसटीसोबत जातीचा पर्यायही जोडला गेला आहे.
विशेष म्हणजे, लोकांनी कोरोना लस कुठे घेतली होती, हा प्रश्नही विचारला जाईल. यासोबत मोबाईल नंबर, आधार, मतदार ओळखपत्र आणि बँक खात्याशी संबंधित प्रश्नही असतील.
यापूर्वी १९३१ मध्ये झाली होती जातनिहाय जनगणना
ब्रिटिश राजवटीत १९३१ मध्ये शेवटची सर्वसमावेशक जातनिहाय जनगणना जाहीर झाली होती. ब्रिटिशांच्या काळातील ती शेवटची व अधिकृत प्रकाशित जातवार आकडेवारी होती. स्वातंत्र्योत्तर काळात १९५१ पासूनच्या जनगणनेत केवळ अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) यांच्याच नोंदी ठेवल्या गेल्या, इतर जातींची मोजणी बंद केली गेली.
सामाजिक सलोखा राखणे हा यामागे उद्देश होता. आता २०२७ च्या आगामी राष्ट्रीय जनगणनेत तब्बल ९६ वर्षांनंतर प्रथमच सर्व जातींची मोजणी होत आहे. ही स्वतंत्र भारतातील पहिलीच सर्वसमावेशक जातनिहाय जनगणना असेल.
ओळख आणि कुटुंब
१. व्यक्तीचे नाव
२. कुटुंबप्रमुखाशी नाते
३. लिंग
४. जन्मतारीख आणि वय (पूर्ण वर्षांमध्ये)
५. सध्याची वैवाहिक स्थिती
६. विवाहाच्या वेळचे वय (पूर्ण वर्षांमध्ये)
७. जोडीदाराचे नाव
८. घोषित राष्ट्रीयत्व
९. धर्म
१०. अनुसूचित जाती (एससी) / अनुसूचित जमाती (एसटी) / जात
११. वडिलांची माहिती
१२. आईची माहिती
१३. अपंगत्व (असल्यास)
१४. मातृभाषा आणि ज्ञात असलेल्या इतर भाषा
शिक्षण आणि भाषा
१५. साक्षरता आणि डिजिटल साक्षरतेची स्थिती
१६. शैक्षणिक संस्थेतील उपस्थितीची स्थिती
१७. प्राप्त केलेली सर्वोच्च शैक्षणिक पात्रता आणि शाखा/विषय
रोजगार
१८. गेल्या वर्षभरात कधीही काम केले आहे का?
१९. आर्थिक क्रियाकलापाचा प्रकार
२०. व्यवसाय
२१. उद्योग, व्यापार किंवा सेवेचे स्वरूप
२२. कामगाराचा वर्ग
२३. गैरआर्थिक क्रियाकलाप
२४. कामाच्या शोधात किंवा कामासाठी उपलब्ध
२५. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठीचा प्रवास
जन्म आणि स्थलांतर
२६. जन्मस्थान
२७. मागील वास्तव्याचे ठिकाण
२८. स्थलांतराचे कारण
२९. मागील स्थलांतरापासून या गावात/शहरात वास्तव्याचा कालावधी
३०. कायमस्वरूपी निवासी पत्ता
३१. सध्या जिवंत असलेल्या मुलांची संख्या (केवळ विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि विभक्त महिलांसाठी)
३२. आजवर जिवंत जन्मलेल्या मुलांची एकूण संख्या (केवळ विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि विभक्त महिलांसाठी)
३३. गेल्या वर्षभरात जिवंत जन्मलेल्या मुलांची संख्या (केवळ विवाहित महिलांसाठी)
इतर
३४. कोव्हिड-१९ लसीकरणाचे ठिकाण
३५. बँक खात्यांची एकूण संख्या
३६. मोबाईल क्रमांक (उपलब्ध असल्यास)
३७. आधार क्रमांक (उपलब्ध असल्यास)
३८. मतदार ओळखपत्र क्रमांक (उपलब्ध असल्यास)
३९. पासपोर्ट क्रमांक (भारतीय पासपोर्टधारक असल्यास)
४०. ड्रायव्हिंग लायसेन्सची उपलब्धता