

मुंबई : राज्यात अनियमित पाऊस, साचलेले पाणी आणि बदलते हवामान या कारणांमुळे डासांची उत्पत्ती वाढली असून, मलेरिया, डेंग्यूचा, चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात मुंबई मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाची हॉटस्पॉट ठरली आहे.
यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली होती. हा पाऊस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरूच होता. या कालावधीत हवामानात सातत्याने बदल होत असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले. राज्यात मान्सून परतला असला तरी सध्या साथीच्या आजारांचा प्रकोप सुरूच आहे.
आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया आणि जलजन्य आजारांचे 39,718 रुग्ण नोंदले गेले असून 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
मलेरिया व डेंग्यू या डासजन्य रोगांनी ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 7 नोव्हेंबरपर्यंत राज्यात मलेरियाचे 20,166 रुग्ण आणि 15 मृत्यू, तर डेंग्यूचे 12,351 रुग्ण नोंदवले गेले आहेत.
याशिवाय, जलजन्य आजारांमध्ये कॉलरा (191), पिवळा ताप (687), गॅस्ट्रोएन्टरायटिस (43), अतिसार (1,234) आणि टायफॉईड (22) रुग्ण आढळले आहेत. बर्ड फ्लूचीही 73 प्रकरणे नोंदली गेली आहेत.
इतर जिल्ह्यांचीही स्थिती चिंताजनक
गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे 6,088 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे नाशिकमध्ये 576 आणि ठाण्यात 488 रुग्ण नोंदले गेले. चिकनगुनियाचे पालघरमध्ये 343 आणि पुण्यात 235 रुग्ण आहेत. लेप्टोस्पायरोसिसच्या 810 रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. स्क्रब टायफसच्या 281 प्रकरणांमध्ये 9 जणांचा बळी गेला आहे.
आरोग्य विभागाने साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी सात सूत्री आराखडा तयार केला आहे. यात जलद सर्वेक्षण, कीटक नियंत्रण, फॉगिंग, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण मोहिमांचा समावेश आहे. स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, स्क्रब टायफस, इन्फ्लुएंझा व बर्ड फ्लूवरील नियंत्रणासाठीही स्वतंत्र कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. नागपूरसह सर्व जिल्ह्यांत आरोग्य निरीक्षण वाढविण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी सांगितले.
मुंबईत सर्वाधिक रुग्ण
मुंबईतच जानेवारीपासून मलेरियाचे तब्बल 8,697 आणि डेंग्यूचे 5,246 रुग्ण नोंदले गेले आहेत. चिकनगुनियाचे 726 रुग्ण असून, या आजारांमध्ये मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे. शहरातील घनदाट लोकसंख्या, ओलसर हवामान आणि साचलेले पाणी यामुळे डासांची पैदास वाढली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.