

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत रक्ताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरात दररोज सरासरी एक हजार ते 1400 युनिट रक्ताची गरज असून गुरुवारी महापालिका रुग्णालयांत फक्त 682 रक्तसाठा शिल्लक होता. शताब्दी रुग्णालयात 15, तर जीटी रुग्णालयात फक्त तीन, तर केईएमसारख्या मोठ्या रुग्णालयातही 76 युनिट रक्तसाठा शिल्लक आहे.
विविध रक्तपेढ्यांत ओ निगेटिव्ह 13, बी निगेटिव्ह 28, ए निगेटिव्ह 15, तर एबी निगेटिव्ह 21 युनिट रक्त शिल्लक आहे. दरम्यान, रक्तपेढ्यांतील साठा संपत आल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आणि नियमित रक्तदात्यांची संख्या घटल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. रक्तदान हे जीवदान आहे, पण सध्या दातेच कमी झाले आहेत. फक्त ओ निगेटिव्ह ए+, बी+, बी-, एबी+ असे सर्व रक्तगट दुर्मीळ होत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
नागरिकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहन रक्तपेढ्या, रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आले आहे. नियमित रक्तदानामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होते, असा संदेश देण्यात येत आहे. याबाबत राज्यसंक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही .
मुंबईत दररोज 1000 ते 1400 युनिटची गरज
मुंबईत 55 रक्तपेढ्या आहेत. यातील 15 रक्तपेढ्या सरकारी आणि महापालिकेच्या आहेत. मुंबई दररोज 1000 ते 1400 युनिट रक्ताची गरज असते. रक्त संकलनाची आकडेवारी बदलत असून 600 ते 1500 पर्यंत रक्तसंकलन होत असते. एखादे मोठे रक्तदान शिबीर झाल्यास हा आकडा 2000 रक्त युनिटपर्यंत पोहचतो.
रक्ताची टंचाई कुठे?
केईएम रुग्णालयात एबी निगेटिव्हचा साठा संपला असून 1 युनिट ओ निगेटिव्ह व दोन युनिट ए निगेटिव्ह रक्त शिल्लक आहे.
सायन रुग्णालयात ओ निगेटिव्हचा साठा संपला असून ए निगेटिव्हचे फक्त दोन युनिट रक्त शिल्लक आहे.
शताब्दी रुग्णालयात ए , एबी व ओ निगेटिव्हचा साठा संपला आहे.
राजावाडीतही ओ पॉझिटिव्ह व ओ निगेटिव्हचा साठा संपला आहे.
जीटी रुग्णालयात तर खडखडाट झाला असून फक्त तीन युनिट रक्त शिल्लक आहे.
कामा रुग्णालयातही ए व बी निगेटिव्ह व एबी पॉझिटिव्ह व ओ निगेटिव्हचा साटा संपला आहे.