मुंबई: पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नेत्यांनी मतदारसंघनिहाय दौरे सुरू केले आहेत. जागा वाटपाची चर्चा, यात्रा, सभा, दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. (Prakash Ambedkar)
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व माजी खासदार राजू शेट्टी तिसरी आघाडी स्थापन करण्य़ाच्या तयारीत असताना वंचितचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत. ओबीसी आणि आदिवासी संघटनांना सोबत घेऊन आम्ही आघाडी स्थापन करणार आहोत. त्यामुळे या आघाडीत कोणाला यायचे असल्यास त्यांनी आमच्याकडे यावे, आम्ही कोणाकडे जाणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. (Prakash Ambedkar)
लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेऊन मराठा समाजाचा पाठिंबा मिळविण्याचा आंबेडकर यांचा प्रयत्न होता. मात्र, आम्ही जरांगे यांच्यासोबत जाणार नसल्याचे त्यांनी आता स्पष्ट केले.