Maharashtra Drought Relief: निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही देणार मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

दुष्काळी यादीत नसलेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा
Devendra Fadanvis
Devendra FadanvisPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: दुष्काळाच्या निकषात न बसलेल्या तालुक्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘ट्रिगर-१’ आणि ‘ट्रिगर-२’मधील निकषातही न बसणार्‍या तालुक्यांना ‘प्रत्यक्ष पाहणी’ करून मदत देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

पिके करपली किंवा नुकसान झाले असतानाही केवळ निकषात बसत नाही म्हणून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. पिकांची करपलेली अवस्था प्रत्यक्ष पाहून दुष्काळाचे सर्व लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी दुष्काळी उपाययोजना, अग्‍निवीर योजनेसाठी समांतर आरक्षण, आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचे आंदोलन आदी मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले.

यंदा पहिल्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर त्यानंतरच्या दोन महिन्यांत पाऊस झाला नाही. अशा प्रकारची स्थिती सामान्यपणे निर्माण होत नाही. त्यामुळे, दुष्काळी उपाययोजनांच्या पारंपरिक निकषांमध्ये काही तालुके बसत नसले तरी प्रत्यक्ष पिकांचे नुकसान झाले असल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Devendra Fadanvis
Ex Agniveer Jobs: माजी अग्निवीरांसाठी मोठी बातमी! सरकारी नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण; लेखी परीक्षेतूनही सूट

त्यासाठी संबंधित तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘ग्राऊंड ट्रूथिंग’ करण्यात येणार आहे. पिकांची करपलेली अवस्था प्रत्यक्ष पाहून दुष्काळाचे सर्व लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

तांत्रिक बाबींमुळे एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान झाले असूनही तो मदतीच्या निकषात येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी या संपूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण करण्याच्या सूचना दुष्काळासंदर्भातील उपसमितीला देण्यात आल्या आहेत.

त्यासाठी कोणत्याही विभागापुरते मर्यादित न ठेवता संबंधित तालुक्यांतील परिस्थिती जाणून घेण्याची जबाबदारी या उपसमितीवर सोपविण्यात आली आहे. काही ठिकाणी तालुका हा एकक मानून सरासरी काढल्यामुळे प्रत्यक्ष नुकसान लपून राहण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या तालुक्यातील एक-दोन मंडलांची सरासरी जास्त असल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील पावसाची सरासरी वाढू शकते.

त्यामुळे आता केवळ तालुका पातळीवरच नव्हे तर मंडल पातळीवरही परिस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Devendra Fadanvis
Goregaon Mulund Link Road: गोरेगाव-मुलुंड लिंक प्रकल्प फिल्मसिटीला लाभदायी; २०२९ पर्यंत मुंबई महानगरपालिका २० कोटी ८ लाख रुपये भाडे देणार

व्यापक सहमतीने उपवर्गीकरणाचा निर्णय

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबईत झालेल्या आंदोलनाबाबत विचारले असता, या विषयात विविध समाजांची प्रतिनिधी मंडळे आणि त्यांच्या अर्जांचा विचार करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करताना जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे.

यासाठी व्यापक सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनुसूचित जातींमधील ज्या घटकांना आतापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही, त्यांना तो कसा मिळवून देता येईल याबाबत सहमती निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आंदोलन झाल्यावर प्रतिक्रिया देऊ

४ ऑक्टोबरला केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंकडून आंदोलन करण्यात येणार असल्याच्या प्रश्नावर फडणवीस यांनी लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना असल्याचे सांगितले. कोण आंदोलन करत आहे, यावर आपण टीका करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, ज्या मुद्द्यांवर आंदोलन केले जात आहे, तो मुद्दा किती खरा आहे आणि आंदोलनासाठी दिली जाणारी उदाहरणे किती वस्तुस्थितीवर आधारित आहेत, हे समजून घेणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आंदोलन झाल्यानंतर त्यावर योग्य प्रतिक्रिया दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंचनाम्याची माहिती शेतकऱ्यांना देणार

पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी बंधनकारक असणार का, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, पंचनाम्याची प्रक्रिया प्रतिबंधात्मक ठरू नये, असे स्पष्ट केले. पंचनामा कसा झाला आहे, याची माहिती शक्यतो शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न आहे.

मात्र, अनेकवेळा पंचनामा करताना शेतकरी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नसू शकतो. त्यामुळे अशा विविध परिस्थितींचा विचार करून योग्य निर्णय मंत्रिमंडळ उपसमिती घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news