

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या २६५ तालुक्यांमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्कमाफी देण्यात येणार आहे.
या तालुक्यांमधील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहेत.
राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील २५४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून तेथील नागरिकांसाठी विशेष सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्याबाबत मंडळाने विभागीय मंडळांना सूचना दिल्या आहेत.
फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.