

Maharashtra FY Admission
मुंबई : एफवाय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेत अनेक पालक व विद्यार्थ्यांकडून गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नोंदणी केल्यावर लगेचच प्रवेश मिळेल, असा समज अनेकांनी करून घेतला. मात्र, त्यानंतर संबंधित महाविद्यालयासाठी स्वतंत्रपणे अर्ज भरणे आवश्यक असल्याचे लक्षात न आल्याने अनेक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहिले आहेत. आता या विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
विशेषतः दहावीनंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन होते. या सारखी बारावीनंतरही ऑनलाईन सेंट्रल अॅडमिशन पद्धत आहे, असा गैरसमज महामुंबईत राहत असलेल्या पालकांमध्ये आहे. त्यामुळे विद्यापीठाकडे नोंदणी केल्यानंतर ते थेट गुणवत्ता यादीची वाट पाहत होते. विद्यापीठाची नोंदणी ही केवळ प्राथमिक पायरी असून त्यानंतर प्रत्येक इच्छित महाविद्यालयाचा अर्ज भरावा लागतो, हे अनेकांना माहितच नव्हते. या अज्ञानामुळे काही विद्यार्थ्यांनी नोंदणी यादीत नाव असूनही महाविद्यालयांच्या यादीत प्रवेश मिळवला नाही.
काही ठिकाणी पालकांनी वेळेत महाविद्यालयांची यादी भरली नाही, तर काही जणांनी महाविद्यालयांची प्रवेश यादी कशी भरायची याची माहिती मिळवण्यासाठी उशीर केला.
विद्यापीठ व महाविद्यालयांकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात असल्या तरी, सर्वसामान्य पालक व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्यापही ही प्रक्रिया नीट समजलेली नाही. यामुळे गुणवत्ता यादीत संधी असूनही ती गमावण्याची उदाहरणे समोर आली आहेत.
एका पालकाने सांगितले आहे. की माझ्या मुलाला 75 टक्के बारावीला गुण आहेत पण विद्यापीठाचा अर्ज भरला आहे. पण अजून प्रवेश मिळाला नाही हे आज चौकशी केली असता महाविद्यालयात अर्ज भरावा लागतो, असे कळले. आता मला पाचव्या फेरीसाठी प्रयत्न करावा लागणार आहे, असे सांगितले.
दरम्यान, एफवाय पदवी प्रवेशाच्या प्रक्रियेत आता चौथ्या गुणवत्ता यादीनंतरही अनेक विद्यार्थ्यांचे पाचव्या यादीकडे लक्ष लागले आहे. ही पाचवी गुणवत्ता यादी 14 जून रोजी दुपारी 12 वाजता जाहीर होणार आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमांची चौथी गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर केली. यामध्ये काही महाविद्यालयांतील मोजक्याच रिक्त जागा भरल्या गेल्या. काही ठिकाणी कटऑफमध्ये किंचित घसरण झाली, तर काही ठिकाणी तितक्याच गुणांच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला. त्यामुळे 70 ते 80 टक्के गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना काही अंशी दिलासा मिळाला असला, तरी कमी गुणांच्या विद्यार्थ्यांना अद्याप संधी मिळालेली नाही आता या फेरीत रिक्त जागावर फेरी मिळण्याची शक्यता आहे.
नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मोठी चुरस पहिल्या दोन यादींपर्यंतच होती. सीईटीचा निकाल लागलेला असला तरी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे विज्ञान शाखेत अनेक प्रवेश झालेले दिसून आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असती तर विज्ञानच्या शाखेच्या जागा मिळाल्या असत्या अशी माहिती महाविद्यालयांकडून देण्यता आली. यंदा पदवीच्या तीन व चार वर्षांच्या अभ्यासक्रमांमध्ये 75 टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. आता उरलेल्या जागांसाठी पाचव्या फेरीत प्रवेश घेता येणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश पोर्टलवर यंदा एकूण 1,45,087 विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व नोंदणी केली होती, तर विविध अभ्यासक्रमांसाठी 5,09,578 अर्ज सादर झाले. त्यात बीकॉम, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी आयटी, बीए, बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी, बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीएएमएमसी, बीएस्सी (बायोटेक्नोलॉजी), बीकॉम (बँकींग अँड इन्शूरंस), बीएस्सी (डेटा सायन्स), बीएस्सी (एआय अँड मशिन लर्निंग), बीएस्सी (डेटा सायन्स अँड एआय), बीएस्सी (एआय), क्लाऊड टेक्नोलॉजी अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी यासारख्या अभ्यासक्रमांना अधिक पसंती मिळाली आहे.